पर्यावरण संरक्षण, संवर्धनाचे जिवंत उदाहरण म्हणजे धनंजय मिसाळ ! माझ्या सारख्या निसर्गाविषयी आवड असणा-या माणसाला निसर्गाच्या सान्निध्यात राहण्यास आवडते. पण हा निसर्ग व त्याचे दिवसेंदिवस होत असलेले पतन, -हास मला पहावत नाही. दरवर्षी डोंगररांगांना लागणारे वणवे ही मुख्य समस्या आहे पर्यावरणाच्या –हासाची असे मला वाटते. आणि बाराही महिने निसर्गाच्या सहवासात, प्रत्येक आठवड्याच्या शेवटी मी घालवतो. त्यामुळे जेव्हा जेव्हा असे वणवे लागलेले पाहतो तेव्हा मनामध्ये प्रचंड राग, चिड येते. काय करावे हे समजत नाही. माणसांच्या पर्यावरणाप्रती अडाणीपणाची किव येते. पण समोर पेटलेले रान व त्यातील आगीचे डोंब इतके भयंकर आणि वेगवान असतात की त्या वेळी अगतिक होऊन, जड अंतःकरणाने हे वणवे पाहण्याखेरीज काहीच पर्याय समोर नसतो. जणु आपल्याच एखाद्या आप्तेष्टाची चिता जळताना मी पाहतोय इतका मी तुटुन जात असतो. आणि हे चित्र फेब्रुवारी ते मे महिन्या अखेर पर्यंत अगदी दररोजच दिसते. मी खुप हताश होतो व परिणामी पर्यावरण संरक्षण-संवर्धन सारख्या शब्दांचा देखील तिटकारा वाटु लागतो. माझ्या सोबत असे झाले आहे मागील अनेक वर्षांमध्ये. मग वाटायचे होऊ दे काय व्हायचेय ते. मला एकट्याला थोडीच धोका आहे याचा? सगळा समाज या अति गंभीर अशा समस्येकडे कानाडोळा करतोय तर मी तरी का म्हणुन उगाचच दुःखी कष्टी होऊ हे सारे पाहुन? होऊ दे ना काय व्हायचेय ते? आणखी ही एक विचार मनात यायचा तो म्हणजे माझ्या एकट्याच्या काही करण्याने काही बदल होईल असे वाटत नाही व दिसत ही नाही. कशाला मग उगाचच जीवाचा आटा-पिटा करायचा. पण जेव्हा फेसबुक वर श्री धनंजय मिसाळ या अवलियाची भेट झाली व त्यांच्या विविध पोस्ट मी पाहिल्या तेव्हा माझ्या मनावर आलेले ते उदासिनतेचे , निष्कर्मण्यतेचे मळभ हळु हळु दुर व्हायला लागले. माझ्या एकट्याच्या प्रयत्नाने परिवर्तन होईल की नाही मला माहित नाही पण धनंजय मिसाळ यांच्या प्रयत्नांनी मात्र सकारात्मक बदल होताना, माझ्या स्वतःच्या मानसिकतेमध्ये मी अनुभवले आहे. कोण आहेत हे धनंजय मिसाळ? गेली दिड दोन वर्षे या व्यक्तिशी फेसबुकच्या माध्यमातुन संपर्कात आहे. फेसबुक वरील दुर्मिळ झाडे व वनस्पती या ग्रुप मध्ये आमचे ओळख झाली. या व्यक्तिच्या फेसबुक वरील पोस्टस पाहता मला आधी वाटायचे की या माणसाने पर्यावरण रक्षणाचे कार्यच आपले जिवित कार्य, जीवन ध्येय म्हणुन घेतले आहे की काय? एखाद्या पर्यावरण बचाव संस्थेमध्ये ते काम करीत असावेत व त्यामुळेच त्यांयाकडुन एवढे जास्त कार्य होत आहे असे ही मला वाटायचे! सतत अनेकांना रोप निर्मिती साठी प्रोत्साहन देऊन प्रत्यक्ष मदत करण्याचे काम ते करतात. नुसते प्रोत्साहन देऊन थांबत नाहीत तर प्रत्यक्ष मदत देखील करतात. फेसबुकच्या माध्यमातुन त्यांना भेटलेल्या शेकडो लोकांना, त्यांनी विविध देशी वृक्ष-वेलींच्या बिया पोस्टाने पाठवुन प्रत्यक्ष मदत केली आहे. त्यांना कोणत्याही झाडा-वनस्पतीच्या बिया सापडल्या की त्या संकलित करणे व इच्छुकांना पोस्टाद्वारे पाठवणे हे काम धनंजय मिसाळ सर गेली अनेक वर्षे करीत आहेत. आज जागतिक पर्यावरण दिवस आहे. आज सोशल मीडीयावर या दिन विशेषाच्या शुभेच्छा, पर्यावरणाचे महत्व, पर्यावरणावरील संकटे, प्रदुषण, जंगलांचा –हास, जलवायु समस्या अशा एक ना अनेक गोष्टींविषयी पोस्टस, पोस्टर्स पहायला मिळतील. सोशल मीडीयाच्या वापरामुळे जसे अनिष्ट गोष्टी वेगाने प्रसारित होताहेत, त्याच प्रमाणे काही चांगले, इष्ट व समस्त विश्वाच्या कल्याणाच्या गोष्टी देखील आंतरजालावर प्रसारित होत आहेत. हे खुप चांगले आहे. यामुळे निसर्ग, पर्यावरणाप्रती जागरुकता निर्माण होण्यास मदत होईल यात शंका नाही. सुरुवातीस त्यांच्या विषयी मला झालेला गैरसमज होता, हे नंतर मला त्यांच्याशी बोलल्या नंतर समजले. कारण हा मनुष्य चक्क तुमच्या-आमच्यासारखा, नोकरी करणारा, एक गृहस्थ आहे. आपल्याकडे जेवढे म्हणजे २४ तास असतात तेवढेच त्यांच्याकडे देखील आहेत. आपणास जशा अनेक गार्हस्थ समस्या, संकटे, आव्हाने आहेत तशीच त्यांनादेखील आहे. आपणास जशी प्रगतीची करीयरची स्वप्ने आहेत तशीच त्यांना देखील होती, आहेत! आपणास ज्या प्रमाणे दररोजची लढाई करावी लागते जगण्यासाठी, दुनियादारीमध्ये तशीच, किंबहुना त्याहीपेक्षा जास्त किरकिर त्यांना रोज सहन करावी लागते. आपण जसे गरीब, शेतकरी कुटूंबातुन, दुर्गम ग्रामीण भागातुन आलेलो आहोत तसेच ते देखील आहेत. ग्रामीण भागातुन आलेले श्री मिसाळ हे एक अभियंता आहेत. करीयरची सुरुवातीची ३ वर्षे त्यांनी पद्विका महाविद्यालयात व्याख्याता म्हणुन काम केले आहे. व त्यानंतर महावितरण या शासकिय आस्थापने मध्ये गेली १९ वर्षे नोकरी करीत आहेत. कनिष्ट अभियंता या पदापासुन सुरुवात करुन सध्या ते महावितरण मध्ये उपकार्यकारी अभित्यंता म्हणुन कार्यभार सांभाळत आहेत. आई व पत्नी यांच्या सोबत नांदुरा येथे त्यांचा निवास आहे. त्यांच्या वडीलांची परंपरागत विड्याच्या पानाची शेती होती. शेतात, रानावनात फिरणे भटकणे त्याकाळातील अनेक मुलांसारखे त्यांनीही केले. निसर्गामध्ये मुक्त पणे भटकणे, हरवुन जाणे, मनमुराद आनंद लुटणे, फुले फळे तोडणे हे सगळे त्यांनी केले. पन्नाशीच्या घरातील अनेकांनी त्या काळामध्ये हे सारे केले असेलच. त्या रम्य आठवणींना उजाळा देताना आपण पुन्हा त्या भुतकाळात हरवुन जातो. पण धनंजय मिसाळांसारखे फारच कमी लोक असतात जे त्यांनी जगलेला भुतकाळ पुढच्या पिढ्यांना देण्यासाठी यथाशक्ति, जाणीवपुर्वक नेमाने काहीतरी करीतच असतात. त्यांना तोच रम्य भुतकाळ भविष्यकाळात देखील जगायचा आहे नव्हे ते जगतात. व पुढच्या पिढ्यांसाठी पर्यावरण रक्षण-संवर्धनाचे बाळकडु देत आहेत. मिसाळ सरांना हे बाळकडु त्यांच्या आजी कडुन मिळाले. त्यांच्या बालपणी आजीने कडुनिंबाच्या बिया गोळा करुन, पाऊस सुरु होण्यापुर्वी शेताच्या बांधावर टोचलेल्या पाहिलेले चित्र त्यांच्या मनःपटलावर कायमचे कोरले गेले. बियांपासुन रोप-झाडे होऊ शकतात नव्हे होतातच याची खात्री विश्वास नकळतच त्यांच्या मनात तयार झाला. त्यांच्या शेतात पारिजात, गुलाब, कन्हेर, जाई-जुई, मोगरा, बेल, जांभळ, सिताफळ अशी वेगवेगळी झाडे होतीच. तेव्हापासुन बिया जमा करणे व लावणे ही आवड, हा छंद त्यांना जडला. बियांपासुन कोणती झाडे येऊ शकतात, कलमांपासुन कोणती झाडे येऊ शकतात या विषयीचे ज्ञान अगदी लहाण असल्यापासुनच त्यांना झाले. त्यांनी लहाण असताना कडुनिंब, औदुंबर आदी झाडे लावली. आज त्याच रोपट्यांचे वृक्ष झालेले त्यांनी पाहिले. मिसाळ सरांचा छंद नुसता त्यांच्यापुरताच मर्यादीत राहिला नाही. त्यांचे लहान भाऊ देखील मिसळ सरांच्या या कामामध्ये त्यांना मदत करीत असतात. लहान भाऊ एक अभ्यासु शेतकरी आहेत व त्यांनी स्वतः हजारो झाडे लावली आहेत. मोठ्या भावाच्या ज्ञान व अनुभवातुन, छोट्या भावाने शेती करण्याचाच निश्चय करुन यशस्वीपणे शेती करीत आहे. अनेक शासकिय पुरस्कार देखील मिसाळ सरांच्या छोट्या भावाला मिळाले आहेत कृषि संदर्भात. दहावीपर्यंतचे शिक्षण एका छोट्या खेडेगावत म्हणजे त्यांच्या जन्मगावातच (अकोली जहागीर) झाले. १२ वी अकोट येथे व शेगाव येथील अभियांत्रिकी महावियालयात त्यांनी अभियांत्रिकी पदवी घेतली. रानावनापासुन जरी काही काळ शिक्षणामुळे लांब रहावे लागले तरी त्यांचा बालपणीचा छंद बिया गोला करुन लावण्याचा त्यांनी अव्याहत पणे सुरुच ठेवला. झाड लावीत जाणे, जगवीत जाणे हे त्यांच्या साठी अगदी सहज साध्य, स्वभाव सिध्द झाले. एखाद्या ठिकाणी झाडे लावण्यासाठी जागेचा अभाव असेल तर झुडुपवर्गीय झाडे लावणे, फुल-वेली लावणे व जगवणे त्यांनी केले. शहाद्यामध्ये महावितरणच्या कार्यकक्षेत येणा-या ग्रामीण भागातील जनतेशी त्यांची नाळ जोडली गेली. क्षेत्र भेटी दरम्यान ज्या ज्या भागात ते जातात त्या त्या भागात जर एखादे अनोळखी झाड-वृक्ष-वेली दिसली तर स्थानिक वयस्कर लोकांकडुन त्याच्या विषयी माहिती घेणे, त्या झाडाचे बीज गोळा करणे व, ज्यांना