कोणतेही महान काम तुमच्या हातुन होण्यासाठी तुम्हाला कोणत्याही विद्यापीठातुन पीएच डी घ्यावी लागत नाही. अशी पीएच डी तर सोडाच साधी पदवी, बारावी, दहावी पर्यंत देखील शिक्षण न झालेला एखादा व्यक्ति ध्येयाने पछाडल्याने आणि महानतम कर्म आपल्या हातुन व्हावे म्हणुन गेली जवळजवळ दोन तपे कष्ट उपसत आहे. मनुष्य जन्माने, धनसंपत्तीनेच मोठा होतो असे नाही तर कर्माने देखील तो श्रेष्ठत्व प्राप्त करुन घेऊ शकतो याचे जिवंत म्हणजे आजच्या आपल्या या प्रेरणादायी कथेचे, अस्सल जिंदगीतील नायक आहे. या हिरोची जीवनकथा व त्याचे त्याच्या धेयाप्रती समर्पण पाहिले की तुम्हाला माझ्या या लेखातील पहिल्या वाक्याचे सत्यता पटेल. आपल्या या नायकाचे नाव आहे लाल. एखाद्या सिनेमातील कथा वाटावी इतकी रंजक, करुण, दुखःद जरी असली तरी ही कथा सत्य आहे. प्रत्यक्ष घडली आहे. सकारात्मक बदल होऊ शकतात, एखादा मनुष्य आंतर्बाह्य बदलु शकतो, तो नुसता स्वतःच बदलत नाही तर त्याच्याकडुन महान असे इहलोकी महान असे काम ही होऊ शकते, त्याच्या कडून अनेकजण प्रेरणा देखील घेऊ शकतात; अशा सा-या शक्यतांना पुन्हा एकदा रान मोकळे करुन देणा-या लालचा जन्म कोल्हापुरातील एका अगदी छोट्याशा खेड्यात झाला. याचे वडील वनखात्यात रखवालदार म्हणुन केवळ दोन रुपये मजुरीवर नोकरीला होते. त्यामुळे तीन मुलांच्या त्यांच्या संसारात काटेच काटे होते. स्वतःच्या मालकीची शेतजमीन देखील अगदीच कमी असल्याने व कोरडवाहु असल्याने त्यातुन काहीही हशील होत नव्हते. लालच्या जन्मानंतर हे कुटुंब त्यांच्या दानोळी या गावातुन तमदलगे या गावाजवळील वनक्षेत्रात राहण्यासाठी गेले. आपल्या हिरोच्या नकळतच त्याच्यावर इतक्या लहान वयात जंगलांचे संस्कार सुरु झाले.सोबत चौथीपर्यंत शिक्षण देखील याच गावातील शाळेत झाले. सुटीच्या दिवशी वडीलांसोबत जंगलात, वनीकरणात काम करावे लागायचे. त्या काळी रोप बनवण्यासाठी ज्या प्लास्टीकच्या काळ्या पिशव्या मजुरांकडुन मातीने भरुन घेतल्या जात त्याची मजुरी तुम्ही ऐकाल तर थक्क व्हाल. शंभर पिशव्या मातीने भरुन दिल्यावर एक रुपया मजुरी मिळायची. आपला हिरो देखील वडीलांना त्यांच्या कामात मदत करायचा. कधी पिशव्या भरण्यासाठी तर कधी घायतळाची रोपे जमा करण्यासाठी , तर कधी डोंगर उतारावर मातीच्या ताली बांधण्यासाठी. तब्बल चार वर्षे तमदलगे तील जंगलात वास्तव्य करुन हे कुटुंब पुन्हा मुळ गावी आले. इकडे पाचवीला शाळेत प्रवेश घेऊन शाळेत जाऊ लागलेला लालचे मन मात्र जंगलात रमायचे. त्याला शाळेत जे शिक्षक होते त्यांचे नाव शेडबाळे सर. एकदा शाळेत जायला उशिर झाला म्हणुन शेडबाळे सरांनी मागेपुढे न पाहता लालच्या कानशिलात लगावली. लाल ला हा फटका अगदी वर्मी बसला. त्या दिवसापासुन लाल ने पुन्हा कधीही शाळा पाहिली नाही. जशी त्याने शाळेकडे पाठ फिरवली तसेच शाळेने, शेडबाळे सरांनी देखील कधीही त्याला पुन्हा शाळेत आणण्यासाठी प्रयत्न नाही केला. शेडबाळे सरांमुळे लालची शाळेशी, शिक्षणाशी नाळ तुटली ती कायमचीच. मग काय लाल बेफान सुटला. प्रत्येक गावात असतात तशी टुकार टवाळ माणसांचा वारसा त्याला मित्रमंडळींमुळे कधी लाभला हे त्यालाच काय पण त्याच्या कुटुंबाला देखील समजले नाही. शिक्षण सुटल्यापासुन वैवाहिक जीवन सुरु होईपर्यंत लाल होत्याचा नव्हता झाला होता. योग्य-अयोग्य, नीती-अनीती यांचा कसलाही विचार न करता मिळेल त्या मार्गाने, जसे जमेल तसे, जितके जमतील तितके पैसे कमाविणे हाच त्याचा नेम होता. गाडी रुळावरुन इतकी फाफलत गेली की लाल आता चक्क दारु गाळण्याचा व्यवसाय करु लागला. आज इतक्या वर्षांनी जेव्हा लाल ला याबाबत विचारले तर ते म्हणतात की स्वार्थ आणि मोह मनुष्याला माणुसपण सोडुन वागायला नेहमीच प्रेरीत करीत असतात. संयमाचा अभाव, मोठ्यांचा अनादर, कशाचीही परवा न करणे अशा कारणांमुळे नकळतच कधी ते वाममार्गाला लागले ते त्यांचे त्यांना सुध्दा समजले नाही. लग्न झाले, दोन मुली घरात हसु-रडु लागल्या, खेळु लागल्या. तो काळ पाहता मुलगा व्हायलाच पाहिजे असा हट्ट न करता, एका अर्थने वाम मार्गाला गेलेला लाल मात्र माणुस म्हणुन अजुनही ठाम होता. दोनच मुलींवरच समाधान मानणा-या लालच्या आयुष्याला मात्र पुढे वेगळेच वळण लागणार होते. अनुचित मार्गाचा शेवट नेहमी कुणालाही न आवडणा-या ठिकाणीच होतो. तसेच लालचे देखील झाले. मोठी मुलगी दिड वर्षांची तर छोटी मुलगी फक्त दिड महिन्यांची असताना लाल सांगलीच्या कारागृहात बंदिवान झाला. जेल मध्ये असतानाम, जे काही दिवस शिक्षा  भोगली त्या दिवसांत तावुन सुलाखुन निघालेल्या सोन्यासारखा लालमधे आंतरिक बदल झाला. तो इतका झाला की चक्क जेल मध्ये असतानाच त्याच्या हातुन जेल मधील डझनभर झाडे तुटण्यापासुन वाचली. इलेक्ट्रीकच्या तारांना लागत असल्याने ही भली मोठी झाडे तोडण्याचा निर्णय कारागृह प्रशासनाने घेतला. व त्याप्रमाणे ते काम सुर होणार इतक्यात लाल जेलर साहेबांना म्हणाला की साहेब ही झाडे कापु नका, आपण त्याच्या तेव्हड्याच फांद्या फक्त छाटु ज्या वीजेच्या तारांला लागतात. पण जेलर साहेबांना ही कल्पना जरी आवडली असली तरी ती प्रत्यक्षात करण्यासारखी नाही याचीदेखील त्यांना कल्पना होती. त्यामुळे जेलर साहेबांनी झाडे तोडली जाणारच असे ठरविले. कारण ही झाडे खुपच ऊंच होती. एका अर्थाने हे सारे महान वृक्ष होते. कदाचित शेकडो वर्षे ते ठामपणे त्याच जागी उभे असतील. लाल ला ही अडचण जशी समजली तसे लाल ने जेलर साहेबांना कळवले की लाल स्वतः झाडांवर चढुन फांद्या छाटण्याचे काम करील, ते ही पुर्णपणे त्याच्या स्वतःच्या जबाबदारीवर. जेलर साहेबांनी यावर विश्वास ठेवुन होकार दिला. ही घटना २००१ ची आहे. हल्लीच म्हणजे डिसेंबर २०२० मध्ये लाल जेव्हा या कारागृहाच्या बाजुने , खानभागच्या रस्त्याने जात होते तेव्हा त्यांना ती सारी झाडे दिसली. म्हणजे लाल ने जे काही केले त्यामुळे ते महावृक्ष अजुनही दिमाखात उभे आहेत. त्याम्च्या अंगाखांद्यावर शेकडो हजारो पक्ष्यांची घरटी आहेत. शेकडो लोकांना सावली देणारी ही झाडे आजही जिवंत आहेत याचे बहुंशी श्रेय लाल ला जाते. तुरुंगातील शेवटच्या दिवशी त्याला घरी नेण्यासाठी त्याची पत्नी आणि दोन्ही मुली आल्या. त्या चिमुकल्या दोन्ही मुलींना पाहुन, लाल ने मनाचा निश्चय केला की पुन्हा वाममार्गाला लागायचे नाही. पुढे काय करायचे, कुठे जायचे, घर कसे चालवायचे असे काहीही माहित नव्हते पण मनाचा निश्चय मात्र पक्का होता. म्हणतात ना इच्छा तिथे मार्ग असतोच. मार्ग नसला तरी ही सृष्टी तुमच्या निश्चयामुळे तुमच्यासाठी मार्ग तयार करतेच. काहीसे असेच झाले पुढे. स्वतःच्या गावी वाट्याला आलेल्या थोड्याशा शेतात काम सुरु केले. सोबतीला शेळीपालन सुरु केले. अपार कष्ट केले. पण हाताची आणि पोटाची जुळवणी करताना परवड व्हायचीच. आर्थिक बाजु अजुन कच्ची होत गेली. अशातच एका ओळखीतील एका सदगृहस्थाचे पुण्याजवळील पानशेत येथे एक फार्महाऊस असुन त्या फार्म हाऊस ची देखभाल, राखण, तेथे वृक्षारोपण अशा कामांसाठी या गृहस्थाला एका माणसाची गरज होती. लाल ने लागलीच हो म्हंटले व २००३ मध्ये लाल कुटुंबासमवेत पुण्याजवळील पानशेत येथे येऊन राहु लागला. बालपणातच जंगलकडु (बाळकडु म्हणतात ना तसे जंगलकडु) मिळालेले असल्याने लाल ने फार्महाऊस चे रुप पालटुन टाकले. छोट्याशा जागेत त्यांनी पन्नास झाडे लावली व जगविली. लाल चे मालक एक अभ्यासु तसेच पर्यावरणाविषयी आस्था असणारे गृहस्थ. त्यांना वृक्ष संवर्धन, वृक्षारोपण, देवराई, दुर्मिळ देशी वृक्षांचे संरक्षण व संवर्धनाची आवड आहे. फार्म हाऊस च्या या मालकाने केवळ स्वतःचे फार्म हाऊसच सांभाळले असे नाही तर पानशेत परीसरात पर्यावरण संरक्षण, संवर्धनासाठी देखील सेवाभावी वृत्तीने कार्य