अंधार पडण्यापुर्वी सुरक्षित जागा गाठणे व स्थानिकांकडुन माहिती घेणे हा माझा हेतु होता. आणि अचानक मला माझ्यापासुन पुढे साधारण पाचच फुट अंतरावर थोडी सळसळ जाणवली. एका मोठ्या झाडाचा बुंधा मध्ये असल्याने मला त्या क्षणाला सळसळ झाली ती जागा दिसली नाही. मी त्याच गतीमध्ये होतो, आणि अजुन एक पाउल पडले तसे मला सापाचे शेपुट दिसले. भुरकट- तपकिरी रंगाचे, अगदी स्पष्टपणे चमकणारे. पुढच्या पाऊलाला मला जे दिसले ते पाहुन मात्र माझ्या काळजाचा ठोकाच चुकला. धस्स झालं. पोटात भीतीचा गोळा आला.