पिसोरी – सह्याद्रीतील माणसापेक्षाही जुना-जाणता प्राणी दोन मे ते पाच मे असे एक लहान मुला-मुलींचे निसर्गशिबिर निसर्गशाळा येथे होणार होते. त्यासाठी आवश्यक त्या सर्व साहित्याची खरेदी करुन मी एक मे रोजी पुण्यातुन वेल्ह्यात निसर्गशाळा येथे रात्री उशीरा जाण्यासाठी शहराच्या बाहेर पडलो. पाबे घाट ओलांडुन, वेल्हे गावाच्याही पुढे जाऊन, भट्टी खिंडीत हळु हळु गाडी पुढे सरकत होती. रात्रीचे अकरा वाजले असतील. सर्वत्र काळॉख होता, ढंगाची हजेरी होतीच. त्या खिंडीतुन थोडं पुढे आल्यावर ढगांच येण खुपच वाढलं. ते ढग आणि तो काळोखाला चिरणारा गाडीच्या हेडलाईट्स चा प्रकाश आणि त्या प्रकाशासोबत पुढे पुढे सरकणारी गाडी, गाडीत मी. अचानक गाडीसमोर रस्त्याच्या डाव्या बाजुने दोन ते तीन उड्यांमध्येच एक भला मोठा उंदीर की काय आडवा गेला. आकार अगदी उंदरासारखाच. तीन चार क्षणांचाच काय तो अवधी मिळाला असेल त्याला पाहण्याचा, पण इतक्या कमी वेळात देखील त्याची छवी कायमची मनःपटलावर उमटली. अंगावर ठिपके, पुढील पायाकडुन मागील पायांकडे जाणा-या ठिपक्यांच्या दोन तीन रांगा, मध्ये पोटाच्या भागावर रुंद होत्या, त्यातील अंतर वाढलेले होते तर मागील पायापर्यंत येईस्तोवर पुन्हा त्या रेषांमधील अंतर पुढील पायांप्रमाणेच कमी झालेले. इतक्या कमी वेळात नीट पहायला मिळणे हे देखील औघड असते तर फोटो काढणे महाकठीण काम. पुढील चार पाच दिवस मी कॅंप मध्येच व्यस्त होतो. नंतर जस वेळ मिळेल तस या प्राण्याबद्दल माहिती मिळविण्याचा प्रयत्न केला. मिळालेली माहिती अवाक करणारी आणि आनंद देणारी देखील होती. आनंद यासाठी की आपल्या वेल्हे तालुक्यात अजुनही हे दुर्मिळ होत असलेले जीव वास्तव्यास आहेत. कदाचित वेल्हे तालुक्यात हा जीव आढळल्याची ही पहिलीच नोंद असावी. यापुर्वी मी साळींदर, काळींदर, भेकर, ठिपकेदार हरीण, तरस, घोरपड, रानडुक्करं असे प्राणी अनेकदा निसर्गशाळा परिसरात पाहिले आहेत. पण याचे दर्शन पहिल्यांदाच झाले. आधुनिक जैव इतिहासाच्या अभ्यासातुन आपणास असे समजते की मनुष्यप्राण्याचा वावर या पृथ्वीतलावर साधारण ७० लक्ष वर्षांपासुन आहे, उत्क्रांतीवाद म्हणतो की काळाच्या ओघात मनुष्याची उत्क्रांती होत गेली व चार पायांच्या माणसापासुन आजपर्यंत दोन पायांवर चालणारा , ताठ उभा राहणार संपुर्ण विकसीत मनुष्य बनला आहे. मनुष्य किंवा त्याचे पुर्वज या पृथ्वीतलावर नांदताहेत त्या काळापेक्षा पाचपट काळ पृथ्वीतलावर नांदणारा एक भलताच लाजरा बुजरा जीव म्हणजे पिसोरी होय. पिसोरी हे नाव आपल्या म्हणजे सह्याद्रीत वास्तव्यास असणा-या, आपल्या पुर्वजांनी या प्राण्याला दिले आहे. कोण जाणे हे नाव कित्येक हजारो वर्षे वापरात असेल. जैवविविधतेचा अभ्यास करणा-या पश्चिमेकडील अभ्यासकांनी याचे इंग्रजी नामकरण करण्यापुर्वीपासुन आपण म्हणजे सह्याद्रीतील मावळे या प्राण्याला ओळखत आहोत. हा जीव पृथ्वीवर अंदाजे साडे तीन करोड वर्षांपासुन अस्तित्वात आहे. म्हणजे जैव उत्क्रांतीमध्ये या प्राण्याचा अनुभव माणसापेक्षा नक्कीच अधिक असल्यानेच तो इतके वर्षे टिकुन आहे. सामान्य इंग्रजीमध्ये यास Mouse Deer म्हणतात तर जीवशास्त्राच्या भाषेत यास Spotted Indian Chevrotain असे म्हणतात. Spotted म्हणजे यावर ठिपके ठिपके असतात. माउस डियर का तर उंदरासारखा आकार आहे म्हणुन. शेपटी अगदी छोटी असते तर शरीर दोन्ही बाजुंना निमुळते असते. तोंड देखील उंदरासारखेच असते तर कान गोलाकार पण त्याच प्रमाणात एखाद्या मोठ्या उंदराला (घुस नाही) शोभावेत असे असतात. हा जीव रात्रीच काय तो बाहेर पडतो. बाहेर पडतो याचा अर्थ तो उघड्या माळरानांवर क्वचितच येतो, शक्यतो तो घनदाट जंगलांमध्येच वावरतो. दिवसभर स्वतःचे रक्षण करण्यासाठी गर्द झाडीखाली छोटीशी गुहा देखील हा प्राणी करतो. याचे पुढील पाय जमीन खोदण्यासाठीच बनलेले आहेत. हा खुप वेगाने धावु शकत नाही तसेच खुप जास्त अंतर देखील धावु शकत नाही. निसर्गात गरुड, अजगर, घोरपड पिसोरीची शिकार करतात, म्हणुनच पिसोरीने गर्द झाडाझुडपांमध्येच वास्तव्य करतो. वटवाघळासारखेच याचेही डोळे असतात. सह्याद्रीमध्ये पिसोरी/पिसुरी म्हणजेच उंदीरमुखी हरीण प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. डोंगर, डोंगर उतार यांचे सपाटीकरण, स्थानिक झाडझुडपं नष्ट करणे, सर्रास लावले जाणारे वणवे ही पिसोरीच्या जीवावर उठणारी काही कामे मनुष्य सातत्याने करतो आहे.पिसोरी आणि इतर सर्वच जीव आपलेच सहोदर आहेत. आपण त्यांचे अधिवास नष्ट केले तर त्यांनी जायचे कुठे? आपण फार्म हाऊस प्लॉटींग बनविण्यासाठी, रिसॉर्ट बांधण्यासाठी, फार्म हाऊस बांधण्यासाठी येथील भुगोल बदलतो आहोत, येथील वनस्पती वैविध्य नष्ट करतो आहोत, येथील जैव विविधतेला धोका निर्माण करतो आहोत. वेल्हे तालुका अजुनही निसर्गसंपन्न आहे असे वाटत जरी असले तरी खुप वेगाने येथील निसर्ग माणुस नष्ट करतो आहे. माणसाने हे असेच सुरु ठेवले तर वेल्हे देखील लोणावळा, खंडाळ्यासारखं बकाल होईल. स्थानिक तरुणांनी हे सर्व समजुन घेतले पाहिजे, पुढिल पिढ्यांकडुन उसना घेतलेला आहे आपण निसर्ग, तो त्यांना आपण आहे तसाच किंबहुन अधिक समृध्द करुन दिला पाहिजे. डोंगर फोडणा-यांना थांबविले पाहिजे, स्थानिक झाडझुडपं काढुन, शहरीतील लॉन लावणा-यांना जाब विचारले पाहिजेत? की या मातीत राहणा-या करोडो जीवजंतु सरीसृपांनी, पिसोरी सारख्या प्राण्यांनी जायचं कुठे? डोंगरांवर मातीच राहिली नाही तर डोंगर तरी राहतील का? जंगलं बहरतील का? पाऊस तरी शतकांच्या नेमाने पडेल का? आपला सह्याद्री म्हणजे अर्ध्या भारताच्या पिण्याच्या पाण्याचा एकमेव स्रोत आहे. तो टिकला पाहिजे. © हेमंत ववले, निसर्गशाळा, पुणे
निसर्गशाळा येथे दहा इंच व्यासाचा मुख्य आरसा असलेली दुर्बीण आहे. यातुन आपण गुरुचे उपग्रह पाहु शकतो, गुरु ग्रहावरील वादळ पाहु शकतो, अनेक दुरस्थ तारे, तारकापुंज पाहु शकतो, चंद्र तर इतका सुंदर आणि स्पष्ट दिसतो की त्यावरील खड्डे नसुन महाकाय विवरं आहेत, दया आहेत, त्यांना खोल असे कडे आहेत. एकदा आपल्याकडे एक खगोल निरीक्षक त्यांची १६ इंच व्यासाची दुर्बीण घेऊन आले होते , त्यातुन त्यांनी मला चंद्रावरील अश्याच एका विवराचा कडा दाखवला. हा कडा पाहताना मला हरिश्चंद्र गडावरील कोकणकडा आठवला. लौकरच आपण म्हणजे निसर्गशाळा बारा इंच व्यास असलेली अजुन प्रगत अशी दुर्बीण घेणार आहोत.
महाराष्ट्राची वीस जुलै ची सकाळ देखील अशीच एक तीव्र वेदनादायी बातमी घेऊन उजाडली. एक अख्खं गाव, चाळीसेक घरांचे एक गाव, दोनेकशे लोकांची वस्ती असलेले एक गाव, आपापल्या घरात रात्रीच्या झो[एत असलेले एक गाव अचानक एका डोंगराखाली दडपले गेले. माळीण पेक्षा या घटनेची तीव्रता जरी कमी असली तरी भौगोलिक दृष्ट्या दोन्ही घटना सारख्याच आहेत. पुर्वी तळीये, रायगडवाडी या दुर्घटना देखील वेदनादायी होत्या. दरड कोसळणे या क्रियापदाने या घटनांची तीव्रता लक्षात येणार नाही. डोंगर कोसळणे असा शब्द प्रयोग आता आपणास करावा लागेल. या घटनांमध्ये अजुन एक साम्य आहे ते म्हणजे डोंगर कोसळताना मातीचे प्रचंड मोठे ढिगारे उताराच्या दिशेने खाली घसरले व शतकांच वारसा असलेल्या वाड्या वस्त्या उध्वस्त झाल्या. मनुष्यहानी झाली. अनेक कुटूंबांचे आधार संपले, जीवाभावाची नाती संपली.
म्हणजेच काय तर आपला भारत आणी भारतातील प्रत्येक पर्वत (हिमालय अपवाद) तितकाच जुना आहे जितके पृथ्वीचे वय आहे. येथील मातीचा कण न कण असा का झाला याचे कारण या मातीने इतक्या करोडो वर्षाम्च्या अनुभवातुन हे शिकले आहे की या सुर्यमंडलात, या अवकाशात तग धरायची असेल तर त्यासाठी कसे स्वतःमध्ये बदल केले पाहिजेत.
पर्यावरण हा शब्द आपल्या कानी पडला की काही जण थोडं थबकतात, काही जणांच्या भुवया थोड्या उंचवतात, काही जणांचे कान अजुन जास्त सतर्क होतात तर काही जणांना काहीही समजतच नाही काय ऐकलं ते म्हणजे नळी फुंकली सोनारे इकडून तिकडे गेले वारे असे काही जणांच्या बाबतीत घडत असते.