भोरगिरी – गुप्तभीमाशंकर – तीर्थ भीमाशंकर – गायदरा – सिद्धगड भटकंती
भोरगिरी ते गुप्त भीमाशंकर टप्पा
सहभागी सदस्य - अरविंद, अनिकेत, अनिल, शशांक, शहाजी आणि हेमंत




या वाटेने जाताना हनुमान लंगुर, माकडं, ससे हे वन्य प्राणी सहज दिसतात. रानडुक्कर, साळींदरं यांचे उकीर दिसतात. जंगली माकडांचे आलार्म कॉल ऐकु येतात तर असंख्य प्रकारच्या पक्ष्यांचे सुमधुर गाणं देखील सतत सोबत करते. थोडं सावकाशीन जंगल पाहत पाहत गेल तर निसर्गाची असंख्य रहस्ये इथे दिसतील. त्यातीलच एक भाग म्हणजे रात्री चमकणारी बुरशी. ही बुरशी कुठे आहे याचा प्राथमिक अंदाज आला आहे. पावसाळ्यात इकडे फकस्त ती बुरशी पाहण्यासाठी यावंच लागतंय. जंगलात प्रामुख्याने अंजनी, अहीन, अर्जुन, भुत्या, आंबा, शिडम, हिरडा, बेहडा, बेल, तेंदू, देशी बदाम, खैर असे वृक्ष आहेत. तर कारवी देखील खुप मोठ्या प्रमाणात आहे. कारवी ची पाने या भागातील थोडी कमी रुंद व कमी लांब आहेत. कारवी खाली गांडूळानी नांगरलेली जमीन दिसत जाते . माकडलिंबू ची झाडे देखील खुप आहेत. कडीपत्ता तर आहेच. ट्रेकर लोकांच्या परिचयाची दातपडी मुबलक आहे. सध्या ती फुलोऱ्यावर आहे. अंजनीचा फुलोरा लक्ष वेधुन घेतो. प्रसंगी दुरवरून अख्खे झाडच जांभळ्या रंगाचं दिसू लागत. इथला पळस अद्याप फुलला नाही. करवंदाच्या जाळ्या बहरू लागल्या आहेत तर हेंकळ ने फळ धारणा केली आहे. मध्येच पिसा ची रक्तवर्णी फुल कधी झाडावर तर कधी पायवाटेवर पडलेली दिसतात.

भीमा नदीचा अगदी झुळूझुळू वाहणारा, सहज उडी मारून ओलांडता येईल अश्या प्रवाहाप्रत आपण पोहोचतो. तिथेच एक स्मृतीशिळा देखील आहे, प्रवाहाच्या पल्याड. मळलेली वाट थोडी उजवीकडे गेल्यासारखी वाटते खरी पण तीच वाट धरावी. आता पर्यत साथ देणारे सर्वच वन्य जीव खाणाखुणा, त्यांचं अस्तित्व येथुन पुढे खूपच जास्त होत जातं. सपाटी सोडून चढाई सुरु केल्यावर जंगल अजूनच जास्त घनदाट होत जातं. आणि याच दांडाच्या गर्द झाडीमध्ये, झाडाच्या एका शेंड्यावरून, फांदीवरून दुसऱ्या फांदीवर झेपावणारी भीमाशंकरी खारुताई चं पहिलं दर्शन आम्हला झाल. हा प्राणी महाराष्ट्राचा ‘राज्यप्राणी’ आहे. शेकरू चे दर्शन होणं म्हणजे भटकंती सार्थकी लागण होय.
(गुप्त भीमाशंकर ते भीमाशंकर टप्पा
तीर्थ भीमाशंकर - गायदरा - सिद्धगड पायथा टप्पा
आता आम्ही बरोब्बर दमदमा डोंगर आणि आहुपे डोंगररांग यांचा मधोमध होतो. डाविकडे दमदमा डोंगर महाकाय तर उजवीकडे आहुप्याच्या सह्य कड्यांचे रौद्र रूप. दमदमा डोंगर खरतर किती मोठा आहे हे दिसतच नव्हते. पण आता तोच डोंगर डाविकडे ठेवत मावळतीकडे आडवं चालयच होत. दमदमा डोंगरांच्या तीन दांडाना वळसा घालत घालत आम्ही चालत राहिलो. एक ठिकाणी आम्हांला वाटेत एक स्मृती शिळा दिसली. आता अजुन हायस वाटलं. अजुन थोडं पुढे गेलो आणि पायवाटेच्या थोडं खाली एक पाण्याचं डबकं दिसलं. त्यातील पाणी स्वच्छ होतं. तिकडेच थोडं दुरवर पाण्याची एक मोकळी प्लास्टिक बाटली देखील दिसली पडलेली. आजचे आमचे गन्तव्य जे होते ते आता अगदी थोड्याच अंतरावर आहे याची खात्री झाली. आणि पुढे पाचंच मिनिटात आम्ही सिद्धगड किल्ल्याच्या कमान दरवाज्यात उभे होतो. अंधार असल्याने नीट पाहता आला नाही दरवाजा, सकाळी पाहु असे म्हणुन पुढे चालत राहिलो. अजुन थोडं पुढे गेल्यावर वाटेत वीरगळी दिसतात. त्या गळींच्या वरच मंदिर आहे. याच मंदिरात आम्हाला मुक्काम करायचा आहे. हे आहे नारमाता देवीचं देऊळ. मंदिर नक्की कसं आहे हे आता अंधारात ठिकसे दिसत नाही पण बांधणी चांगली व नवीन दिसली.
नारमाता देवी मंदीर –हजार वर्षांपूर्वीचा बंदूकधारी वीर - सिद्धगड टप्पा
वीरगळींपाशी मी सर्वात शेवटी पोहोचलो, कारण होते माझं आजारपण. इतका वेळ कसातरी दम धरीत, संथ श्वासोच्छवास करीत मी चालत होतो. माझी गती अजिबत कमी नव्हती झाली. पण शेवट जसा नजरेच्या टप्प्यात आला तस माझ्या शरीराने साथ सोडली. मला खोकल्याचा तीव्र झटका आला. दहा पंधरा मिनिट मी खोखो करीत होतो. उलटी होत आहेसे देखील वाटले पण उलटी होत नव्हती. खोकला मात्र थांबायच नाव घेईना. बाकी सर्व सदस्य नारमाता देवीच्या अंगणात पोहोचले देखील. त्यांच्या मंदीर छान आहे, बांधकाम चांगले आहे, झोप चांगली येईल आज अशा गप्पा पुसट पुसट ऐकु येत होत्या. कुणीतरी वरुन आवाज देखील देत होत अरे हेमंत काय झालं, येऊ का मदतीला वगेरे वगेरे. ते पंधरा मिनिट कसे गेले समजलच नाही. शहाजी मंदीरातुन खाली उतरुन पुन्हा माझ्याजवळ आला. माझी पाठीवरची सॅक त्त्याने घेतली आणि एका हाताने मला आधार देत वर नेण्यासाठी मदत केली. एकेक पाऊल टाकायला मला एकेक मिनिट लागल असेल कदाचित. खुप ह्ळु सावकाश मी मंदीराच्या अंगणाप्रत पोहोचलो. पुर्वाभिमुख असणारे हे मंदीर एका मोठ्या चौथ-यावर बांधले आहे. चौथरा चांगलाच उंच आहे म्हणजे किमान दहा फुट तरी उंच आहेच. मी मुख्य पाय-यांनी मंदीराच्या मुख्य ओसरीत न जाता, थोड डावीकडुन, तोफ ठेवलीये तिकडुन वर गेलो आणि मंदीराच्या शेणाने सारवलेल्या ओसरीत गेलो आणि बसलो. शरीर इतके दमले होते की आता बसुन राहण्याइतकी देखील ऊर्जा शिल्लक नव्हती. पण जर लागलीच आडवा पडलो असतो जमीनीवर तर चक्कर येण्याची भीती होती त्यामुळे बसुन राहिलो. एक दोन मिनिटांनी श्वास थोडा स्थिर झाल्यावर पाणी पिलो ह्ळुह्ळु. खोकला ठसका अजुनही सुरुच होते. बाकीचे सदस्य तोपर्यंत पाण्याचा शोध घेण्यासाठी फिरत होते. अनिल ने रात्रीच्या जेवणासाठी खिचडी भाताची तयारी केली, भाज्या कापा चिरा, लसुण सोलणे, इत्यादी सर्व करण्यात तो व्यस्त होता तर आमचा आणखी सदस्य देखील माझ्या इतका नाही पण तोही पडुनच होता.
मी थोडा सामान्य व्हायला लागलो. डोळ्यांतुन गरम वाफा बाहेर याव्यात इतके डोळे जळजळ करीत होते. शरीर कोरडे पडले होते. पुढचा टप्पा माझ्या आजारपणाचा मला गाठणारच तो म्हणजे फणफणुन ताप येणार हे मला स्पष्ट जाणवत होते. मन-बुध्दी मात्र स्थिर झाले होते. आता पडुन राहिले तर आजार बळावेल मे समजुन मी ऊठलो आणि मंदीर परीसरात लाकुडफाटा गोळा करण्यासाठी बाहेर पडलो. चुल पेटवणं अजुनही बाकी होतंच, ते काम करायला कुणीही नव्हतं. लाकड गोळा करण्यासाठी खुप फिराव लागल नाही. संपुर्ण मंदीराला एक दोन फे-या मारल्या आणि बख्खळ सरपण मिळालं.
चुल पेटवुन मी पुन्हा आराम करण्यासाठी मंदीरात गेलो आणि मॅट अंथरुन पडलो. मंदीरात शेणाने सारवलेली स्वच्छ भुई होती. खरतर या भुई वर काहीही न अंथरताच पहुडले पाहिजे पण थंडी आणि माझं आजारपण यामुळे मी मॅट टाकले. डोळे बंद करुन पडलो. पाणी शोधण्यासाठी गेलेली मंडळी बाहेर आल्याचे आवाज आले. त्यातच त्यांना वाटेत, अगदी मंदीराच्या समोरच, मुख्य पाय-यांच्या खालीच एक हिरवा साप दिसला, असा आहे, तसा आहे, विषारी आहे , नाही, तीन फुट लांब आहे असे त्यांचे संभाषण ऐकु येत होते. पाहायची इच्छा झाली पण शरीर आराम कर म्हणत होते, म्हणून तसाच पडून राहिलो. काही वेळाने, चुलीवर मस्त मसाला भात तयार झाला. त्याचा घमघमाट अगदी मंदीराच्या आत यत होता. त्यातल्यात्यात तुपाची वरुन दिलेल्या धारेचा दरवळ तर सर्वत्र पसरला होता. जेवण मंदीरात आलं, नारमातेला नैवेद्य दाखवला गेला आणि आम्ही सर्वांनी रात्रीचे जेवण केलं. एक किलो तांदुळ, थोडी डाळ, मटर, कांदे बटाटे, , गाजर, इत्यादींनी गर्निश झालेला तो मसाला भात सहा जणांनी फस्त करुन टाकला. जेवण सुरु असतानाच मंदीरात नको असलेला एक, इथलाच कायम, मुळनिवासी देखील असल्याचे समजले. तो होता एक मोठा उंदीर. उंदीर आहे आणि तो सहज पणे आत मंदीरात देखील येऊ शकतोय हे समजल्यावर सर्वांनी मंदीरातच टेंट लावण्याचे ठरविले. मी मात्र तसाच भुईवर टेंट शिवाय झोपलो.
जेव्हा अशा ट्रेकला मी जातो तेव्हा माझा अनुभव असा आहे की सकाळी खुप लौकर जाग येते. काल रात्री आम्ही झोपलो देखेल लौकरच होतो. म्हणुन लौकर जाग येणं अपेक्षित होत खरं पण झाल अस की मला जाग सर्वात आधी आणि मी घड्याळात पाहिले तर सकाळचे चक्क आठ वाजलेले होते. आदल्या दिवशीच मोप चालण्याने सर्वचजण गाढ झोपले. मी तर ॲंटीबायोटिक आणि पेनकिलर चा डोस घेऊन झोपलो होतो त्यामुळे मी देखील उशिरापर्यंत झोपलो. उठल्यावर मला रात्रीपेक्षा अधिक बरे वाटले.
सर्वांना पटापट झोपेतुन जागे करुन, कामाला लावले. चहापान करुन अरविंद, शहाजी, अनिकेत आणि मी असे आम्ही चार जण गड-आरोहनासाठी निघालो. तर अनिल आणि शशांक मागेच थांबले मंदीरात. पाणी आणुन ठेवणे आणि नाश्ता बनवुन ठेवणे असे त्यांना काम होते. आम्ही आधी सिधगड वाडीत गेलो. जाताना वाटेत दगडी गोळे पाहता आले. तसेच अनेक ठिकाणी घरांची जोती देखील दिसली. भीमाशंकर अभयारण्याचा भाग असल्याने महाकाय वृक्ष, वेली इथेही साथ देतात. तिकडे जयवंत कोकाटे नावाचे स्थनिक इसम भेटले. त्यांच्याकडुन किल्ल्यावर जाणा-या मार्गाची माहिती घेतली. इतरही माहिती घेतली जसे आसपासच्या डोंगर द-याची नावे, ओळखं, वन्यप्राणी संपदा इत्यादी. इथुन मागे म्हणजे नारमाता देवी मंदीराच्या दिशेकडे पाहिले तर आपणास उजव्याहाताला सरळ गगनाला भिडणारा सिध्दगड दिसतो. त्यानंतर थोडं पुढे डावीकडे एक छोटी लिंगी दिसते. लिंगी म्हणजे छोटा डोंगरच पण तो सुळक्यासारखा पण थोडा कमी टोकदार असतो. ही लिंगीच सिध्दगड आणि मुख्य सह्याद्रीच्या रांगेला वेगळ करते. या लिंगीचा एक फोटो आहे पहा खाली. या लिंगीच्या पलीकडे जो महाकाय अवाढव्य डोंगर दिसतो तो म्हणजे दमदमा डोंगर. अठराव्या शतकात जेव्हा इंग्रजांनी मराठ्यांचे किल्ले जिंकण्याची, ताब्यात घेण्याची मोहीम हाती घेतली तेव्हा सिध्दगड काही मान टाकत नव्हता. मुळातच अवघड किल्ला, चखोट सरळ कातळकडे हीच सिध्दगडाची तटबंदी होय. किल्ला जिंकता येत नाही असे दिसल्यावर इंग्रजांनी समोरच्या दमदमा डोंगरावरुन तोफा डागल्या आणि सिद्धगडाचे मुख्य वाट तसेच पुर्वेकडी तटबंदी पाडली. त्यानंतर काही काळाने किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेल्याची नोंद आहे.
#bhimashankar #bhorgiri #trekking #jungletrek #nature #siddhagad #सिध्दगडट्रेक #सिध्दगड ट्रेक #गायदरा #कोंढवळ #भट्टी #चुनाभट्टी #गोरखगड #गुप्तभीमाशंकर #डोंगरयात्रा #आनंदपाळंदे #किल्ल्यांचाइतिहास #किल्ले #गडकिल्ले #महाराष्ट्रातील_गडकिल्ले
Share this if you like it..
Leave a Reply