रम्य त्या आठवणी आमचाच नव्हे तर आपणा प्रत्येकाच्याच भुतकाळातील काही भाग आपणास, प्रत्येकास रम्य वाटतो. आपणास आपला तो तो भुतकाळ पुनःपुन्हा जगावासा वाटतो, हवाहवासा वाटतो. आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात अशी काही वर्षे असतात जेव्हा आपण ख-या अर्थाने जगलेलो असतो, असे आपणास आत्ता वाटते. त्या काळातील आपले ते जगणे, आपल्या वर्तमान काळात देखील आपणास जगण्याची आणि ख-या अर्थाने जगण्याची प्रेरणा नक्कीच देत राहते. आणि जेव्हा त्या आठवणी फोटो व डायरीच्या माध्यमातुन पुन्हा समोर येतात तेव्हा तर आपण टाईम ट्रॅव्हलच करतोय की काय असे वाटल्या शिवाय राहत नाही. आमच्या सुदैवाने आमच्या आयुष्यातील ‘तो’ रम्य काळ, तो सुवर्णकाळ थोड्याबहुत का होईना पण डायरीत लिहिलेला, फोटोंमध्ये चित्रीत केलेला आहे. ईष्टापत्ती यावी तसा कोरोना आलेला आहे. या आपत्तीतुन आपण आपापले कोर्स करेक्शन करावे. आपापले ध्येय पुनर्निश्चित करावे. आपापले सखे-सोयरे पुन्हा नव्याने ओळखावेत, आपले आयुष्य आपण नक्की कसे जगले पाहिजे याचे चिंतन करावे. कदाचित आपोआपच यशदिपकडुन जुने बाड धुंडाळणे सुरु झाले असावे. एकेक खजिना सापडावा तसे एकेका ट्रेकचे फोटो, लिखित वृत्त सापडत आहे. मलाही माझे काही जुने लेख, ट्रेक-वृत्तांत, फोटो सापडले. आपल्यापैकी अनेकांना काहीनाकाही सापडले आहेच. आमच्या साठी आमचा ट्रेकिंगचा तो काळ म्हणजे सुवर्णकाळ होता. नुकतीच बारावी होऊन मी संगणक शास्त्र या अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला होता. कॉलेज सांगवीला असल्याने जाणे-येणे अवघड होते. एकही बसमार्ग नव्हता. टु व्हीलर (माझ्या वडीलांची एम-८०) घरी असुनही व चालवता देखील येत असुन तिने प्रवास करण्यासाठी परवानगी नव्हती वडीलांची. मग सपकाळ सर व जगदीश गोडबोले यांच्या माहितीतुन विद्यार्थी सहायक समितीच्या वसतिगृहाविषयी माहिती मिळाली व तिथे प्रवेश घेतला. गावाकडुन शहरात रहायला गेलेला मी न्युनगंडाने ग्रासलेलो होतो. वर्गातील एक दोन मित्र मंडळी सोडली तर माझे फारसे कुणाशी कधीही जमले नव्हते. माझे मन रमायचे ते डोंगरद-यांमध्ये. असे होण्याचे आणखी एक कारण होते, ते म्हणजे माझी ट्रेकिंगचे सवंगडी. सवंगड्यांतील काही चेहरे बदलत राहिले. पण तीन जण मात्र कायम होते. ते म्हणजे यशदीप, देवीदास व मी. त्याकाळात आम्ही तिघांनी अनेक ट्रेक एकत्र केले. आमच्या सोबत कधी माझे मित्र असत तर कधी यशदिपचे मित्र असत. असाच आमचा आणखी एक ट्रेक म्हणजे सांकशी-माणिकगड-कर्नाळा-अलिबाग! यशदिप ने तेव्हा लिहुन ठेवलेल्या डायरीत या ट्रेकचे वृत्त देखील सविस्तर आहे. यशदिप इतक्या बारक्याने सगळ्या गोष्टी लिहित असे हे मला माहित असले तरी नंतरच्या काळात मी ते विसरुन गेलो होतो. पण लॉकडाऊन च्या काळात त्याने हा खजिना पुन्हा शोधुन त्याच्या या विशिष्ट गुणावर साचलेले मळभच जणु दुर केले आहे. मला देखील लिहायची आवड होती, आहे. पण इतक्या बारकाव्याने लिहिणे मला कधीही जमले नाही. कुठे, किती वाजता, कोण-कोण, स्थानिकांच्या नावासहीत त्याने हे जे काही लिहिले आहे ते कायमस्वरुपी संग्रही ठेवावे असेच आहे. आमचा हा ट्रेक झाला तो एकुण पाच दिवसांचा. काय ते दिवस मित्रांनो. हल्ली पाच दिवसांचा ट्रेक करणे निव्वळ दिवास्वप्न होईल. अशी इतक्या जास्त दिवसांच्या ट्रेकची कल्पना देखील हल्ली करवत नाही. कॉलेजांना दिवाळीच्या सुट्या लागल्या होत्या. देवीदासचा नेहमीचा फॉर्मुला होता नोकरीमध्ये ड्युट्यांचे जुगाड करण्याचा. मला देखील वसतिग्रुहात जाऊन एक वर्ष झाले होते. त्यामुळे होस्टेलचा एक मित्र प्रकाश जाधव हा देखील सहभागी झाला होता. सोबतचा त्याचा चुलत भाऊ अतुल होता. असे आम्ही पाच जण. माझ्या साठी अतुल नवीन होता तर यश व देवा साठी प्रकाश व अतुल अनोळखी होते. पण ट्रेक संपताना आम्ही सारेच घट्ट मित्र होऊन गेलो होतो. ट्रेकिंगची हीच खासियत असते. २६ ऑक्टो ते ३० ऑक्टो १९९८ असे पाच दिवस आम्ही भटकत होतो. पहिल्या दिवशी मला विशेषत्वाने आठवते आहे ती दर्गा. आम्हाला जायचे होते सांकशी गडावर. हा एक साधारण गड होता. गावापासुन साधारण दोन तास चालुन आम्ही जेव्हा गडाच्या पायथ्याशी आलो तेव्हा अचानक ही दर्गा समोर दिसु लागली. त्याकाळी मला प्रश्न पडला की अशी दर्गा, इतक्या दुर, दुर्गम भागात कशी काय असु शकते व ती देखील सर्व सोईसुविधांनी युक्त अशी. दर्ग्यापासुन किल्ला अजुनही थोडा ऊंच होता. रात्री तिथे मुक्काम करुन आम्ही दुस-या दिवशी पहाटे गडमाथा गाठला. यशदिप ने या गड-भटकंती विषयी लिहिलेले वाचण्यासारखे आहे. यशदिपची बारकावे पाहण्याची व नोंद करण्याची क्षमता यातुन दिसते. दर्ग्यापासुन गडमाथा गाठण्यासाठी एक सरळ चढाई करावी लागते. गडावर पाहण्यासाठी काय काय आहे हे देखील यशदिप ने लिहिले आहे. या गडमाथ्यावरील यशदिपने काढलेला आमचा एक फोटो सांकशी गड पाहुन आम्ही मोर्चा वळवला माणिकगडाकडे. सांकशी पासुन माणिकगडापर्यंतच्या पायपीतीमध्ये एक सुंदर नदी लागली. त्या नदीच्या काठावर, तरीही थोडे दुर आम्ही दुपारच्या जेवणासाठी चुल मांडुन भात रांधला होता . भात शिजेपर्यंत नदीमध्ये मनसोक्त डुंबण्याचा आनंद देखील आम्ही घेतला. मित्रांनो लक्षात ठेवा असे अनोळखी प्रदेशात नदीमध्ये उतरणे धोक्याचे असते. त्यामुळे असे करणे चुकीचे आहे याची जाणिव आम्हाला नंतर झाली. त्यामुळे तुम्ही असे करणे टाळा. आज जेव्हा मी यशदिपचे हे लिखाण वाचले तेव्हा मला समजले की आम्ही त्याकाळी किती बिनधास्त जीवन जगत होतो. आम्ही दुस-या रात्री माणिकगडावर पोहोचलोच नाही मुक्कामी. किल्ल्याच्या पायथ्यालाच , खुपच जास्त अंधार पडल्याने आम्ही चक्क जंगलातच, एका भात खाचरातच मुक्काम केला. बिनधास्त असलो तरीही आम्ही आळीपाळीने जागरण करण्याचे कामही केले. त्यातच यशदिपची झोप एकदम सावध. जर्रा कुठे खुड्ड झाल की यशदिप उठुन बसतो. आणि मी त्याच्या एकदम विपरीत. अंथरुन असो वा नसो, कुठेही पाठ टेकली रे टेकली की लगेचच मी गाढ झोपी गेलेलो असतो. मला खाड-खुड अशा कशानेच जाग येत नाही. त्यामुळे जागरणाची माझी पाळी असताना देखील यशदिपच जागा होता, हे त्याच्या कडून मला प्रत्येक ट्रेकच्या अशा बिनधास्त मुक्कामानंतरच्या सकाळी समजायचे. असे बिनधास्त तरीही सावध मुक्काम आम्ही खुप केले आहेत. भिमाशंकरच्या घनदाट अरण्यातील मुक्काम, कोकणातुन वर चढुन आल्यावर भिमाशंकरच्या पायथ्याशी असलेल्या जंगलातील मुक्काम, सवाष्णी घाटातील जंगलातील मुक्काम, कैलास गडावरील मुक्काम, प्रचित गड जंगलातील मुक्काम, मोरघळीचा मुक्काम असे अनेक मुक्काम मनःपटलावर अंकित झालेले आहेत. माणिकगडाच्या वाटेविषयी यशदिप ने आवर्जुन लिहिले आहे की हेमंतने वाट चुकवली. वाटा शोधण्यासाठी वाटा चुकाव्या लागतात, त्यामुळे अनेकदा यशदिपच्या लिखाणात हेमंत ने वाट चुकवली असे लिहिलेले आढळते. याचे कारण असे की वाट शोधण्याचे काम पहिले करायला मीच पुढे सरसावुन जायचो. अनेकदा चुकायचे, वाट सापडायची नाही. आणि कधी कधी सापडायची देखील. पण उत्साह मात्र कधीही कमी व्हायचा नाही. वाट शोधण्यात मी अनेकदा चुकलो असलो तरी माझ्या सवंगड्यांनी कधीही माझ्या अविश्वास दाखवुन मला पुढे जाण्यापासुन रोखले देखील नाही. एकमेकांवर विश्वास ठेवणे, ते ही कठीण प्रसंगी खुप महत्वाचे असते. व असे धडे शिकण्याचे आमचे विद्यापीठ होते निसर्गातील अशी ही भटकंती. या ट्रेकच्या दरम्यान क्रिकेट वर्ल्ड-कप च्या मॅचेस सुरु होत्या. त्या दिवशी भारताची एक मॅच होती. देवाचा निम्मा जीव ट्रेक मध्ये तर निम्मा मॅच मध्ये होता. टॉस कुणी जिंकला असेल, बॅटींग कुणी केली, किती रन केले असतील, असे झाले असेल तसे झाले असेल अशा नाना कॉमेंट-या ट्रेकदरम्यान आम्ही ऐकत होतो. माणिकगडची चढाई, गड पाहणी, तेथील स्वयंपाक व देवाची (देवीदास ववले) क्रिकेट साठीची तगमग
काल फेसबुक वर स्क्रोल करताना एक बातमी डोळ्याखालुन गेली. मी खुप गांभीर्याने त्याकडे पाहीले नाही म्हणा! नंतर यशदीप ने एक लिंक शेयर केली त्याच बातमीची. सदभाव म्हणुन मी त्याला रीप्लाय केला. अजुनही मी तसाच होतो उदासिन त्या विषयी. दुस-याच मिनिटाला यशदिपचा फोन आला व पहिलेच वाक्य बोलला तो,”अरे बाप माणुस होता हा! सह्याद्रीतला खडानखडा त्याच्या ओळखीचा!…” यशदिपचे बोलणे सुरुच होते. मला मात्र आता समजु लागले होते नक्की काय झाले होते ते. आमचे बोलणे संपल्यावर मी आवर्जुन फेसबुक वर एक प्रोफाईल पाहिली. अरुण सावंत त्यांचे नाव. हे नाव मी पहिल्यांदाच ऐकत होतो. पण फोटो पाहिल्यावर त्यांना कुठेतरी कधीतरी पाहिले असावे, भेटलो असावे, बोललो,त्यांचे ऐकले असावे असे वाटले. नुसते फोटो पाहुनच त्या माणसाचे सर्व चरित्रच, नव्हे नव्हे डोंगर चरित्रच डोळ्यासमोर उभे राहिले. मला त्यांचे जे चरित्र दिसले त्यात मला त्यांचे लौकिक शिक्षण , नोकरी व्यवसाय, घर गृहस्थी दिसली नाही. त्यांनी किती संपत्ती कमाविले आणि किती नाही हे तपशील दिसले नाहीत. त्यांच्या कडे किती गाड्या, किती फ्लॅट्स, किती धन असेल हे देखील दिसले नाही. त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात काय काय झाले असेल ते देखील दिसले नाही. दिसेलच कसे बरे हे सारे! अजिबात दिसणार नाही. यशदिप च्या म्हणण्यानुसार तो बाप माणुस होता, पण मला त्यांचा फोटो पाहिल्यावर जाणवले की हा माणुस स्किल्स, कौशल्ये, ज्ञान इ च्या धरतीवर बाप माणुस बाप माणुस असेल देखील पण तो तर होता सह्याद्रीचा खराखुरा पुत्र, सह्याद्रीचा सुपुत्र! उंचच ऊंच शिखरांना सर करुन जणु आकाशाला गवसणी घालण्याचा आयुष्यभर प्रयत्न करीत राहणारा हा माणुस, ख-या अर्थाने जमीनीवर होता. माझी त्यांची प्रत्यक्ष भेट झालेली मला आठवत नाही, तरीदेखील मी हे खुप ठाम पणे म्हणु शकतो कारण त्या माणसाने अख्खे आयुष्य या सह्याद्रीच्या अंगा खांद्यावर बागडण्यात घालवले. आणि विचार करा, ज्याचा सखा सह्याद्री असेल ज्याचा पिता सह्याद्री असेल ज्याची माता सह्याद्री असेल तो किती विशाल हृद्याचा असेल! अंगी मोठेपणा असुनदेखील तसुभरही गर्विष्ट होणार नाही, ढळणार नाही एवढी स्थितप्रज्ञता या माणसाने सह्याद्रीकडूनच शिकली असेल. आणि सह्याद्री कुणालाही इतकी महान तत्वे सहजासहजी शिकवित नाही बरका! त्यासाठी तपश्चर्या करावी लागते. या माणसाचे हे चक्क चौथे तप होते सह्याद्रीच्या साधनेतील. इतकी तपश्चर्या केल्यावर विचार करा, साधना-सिध्दी होणारच की! आयुष्याची इतिकर्तव्यता कुणाला धनसंपत्ती मध्ये वाटते , कुणाला प्रसिध्दी मिळविण्यात वाटते , कुणाला सत्ता मिळविण्यात वाटते! असे काहीही वाटण्यात गैर काहीच नाही. कुणाला संगीत, कला, साहित्य तर कुणाला लिखाण, वाचन आदींमध्ये वाटु शकते. आपल्यापैकी अनेकांना आपापल्या आयुष्याचे गमक कधीना कधी तरी समजलेले असतेच. कधीतरी कुठेतरी आपणास हे समजलेले असते की आपल्याला आयुष्यात नक्की काय करायचे आहे. या माणसाला देखील त्याने जेव्हा आयुष्यातील पहिला ट्रेक केला तेव्हाच समजले की त्याला आयुष्य कशासोबत खायचे आहे. व त्याने केलेही तसेच! आपल्यात व त्यांच्यात फरक एवढा आहे की आपणास हे समजुन देखील आपण कधीही आपल्या अंतर्मनाचा आवाज वर येऊ देत नाही. आपणाकडे हजारो कारणे असतात आपल्याला आवडणा-या गोष्टी न करण्यासाठी. आपण एका मागुन एक अशी कारणांची शृंखलाच बनवित असतो. पण या माणसाने कधीही ‘कारणांना’ सह्याद्रीच्या प्रेमापेक्षा मोठे होऊ दिले नाही. एखाद्या मनुष्य जर खुप चांगले आयुष्य जगत असेल, अगदी त्याच्या स्वतःच्या मनासारखे, अनेकांना त्याच्या त्या स्वच्छंदी आयुष्याचा हेवा वाटत असेल, त्याच्या तशा स्वच्छंदी जगण्याने कुणाला ही कसलाही त्रास कधीही झालेला नसेल, तर स्वाभाविक पणे आपण म्हणुन जातो की ‘राव खरच आयुष्य जगतोय बर का हा माणुस!’ आपणास हेवा वाटतो. अरुण सावंत या अवलियाविषयी यशदिप कडुन जे जे ऐकत होतो ते ऐकुण मी मनातल्या मनात सहज म्हणुन गेलो,”हा माणुस तर सह्याद्री जगला!” अनेक नवीन वाटा याने शोधल्या, अनेक नवनवीन आरोहकांना प्रोत्साहीत केले, नवीन उमदे डोंगरभटके तयार केले. सह्याद्रीमधील क्वचित अशी एखादी पायवाट असेल की जिला या माणसाचे बुट लागले नसतील. मला जे वाटले ते बरोबरच होते. हा माणुस ‘सह्याद्री’ जगला! नंतर जेव्हा समजले की कोकणकड्यावरुन रॅपलिंग करतानाच, त्या वक्राकार, अवाढव्य, अमानवीय, रौद्र आणि तितक्याच सुंदर कोकणकड्याच्या कुशीतच त्यांनी अखेरचा श्वास घेतला तेव्हा उस्फुर्त पणे मनात विचार आला. हा माणुस नुसता सह्याद्री जगलाच नाही तर सह्याद्री मेला सुध्दा! He not only lived Sahyadri, He died also Sahydri! अशा सह्याद्रीच्या सुपुत्रांची उणीव भरुन निघणार नाही असे काहींचे मत आहे. मला वाटते ती उणीव निर्माण होऊ नये म्हणुनच त्यांनी आजवर शेकडो हजारो तरुण-तरुणींना सह्याद्रीच्या दिक्षा दिली आहे. ज्यांना ज्यांना अरुण सावंत या अवलियाने मार्ग दाखविला, ज्याला ज्याला वाटते की या अवलियाचे जीवन सफल झाले, ज्याला ज्याला वाटते की हा सह्य-सुपुत्र खरेखुरे आयुष्य जगला, ज्याला ज्याला या सह्याद्रीची स्वप्ने पडतात, ज्याला ज्याला सह्याद्रीच्या पठारावरुन पाहणारे वा-यांची दिशा, द्शा आणि गंध कळतो, ज्याला ज्याला सह्याद्रीच्या उत्तुंग शिखरांना पादाक्रांत करण्याची स्वप्ने पडतात, ज्यांना ज्यांना शिवप्रभुंच्या गडकोटांवर जीवनाची इतिकर्तव्यता दिसते, ज्याला सह्याद्रीरुपी या निसर्गाच्या वरदहस्ताची पुसटशी देखील कल्पना आहे, ज्याला ज्याला डोंगर-द-या म्हणजे माहेर वाटते, ज्याला ज्याला सह्याद्रीतील मोसमी ढगांत स्वर्ग दिसतो, अश्या सर्वांची जबाबदारी आहे, अरुण सावंत या सह्यमहर्षीची उणीव भरुन काढण्याची! आपले जीवन निसर्गमय, सह्याद्रीमय, डोंगरमय करणे हीच खरी या सह्याद्रीच्या सुपुत्राला वाहीलेली सह्यसुमनांजली आहे! हेमंत ववले निसर्गशाळा, पुणे
गिरिप्रेमीने नुकताच कातराबाईचा कडा प्रस्तरारोहन करुन सर केला. यशदिप देखील या मोहीमेमध्ये सहभागी होता. या प्रस्तरारोहण मोहीमेचे संपुर्ण चित्रीकरण करण्यात आले होते. व यथावकाश सर्व आरोहकांचे कौतुक करण्याचा कार्यक्रम सोहळा झाला व त्यामध्ये या मोहीमेचे संपुर्ण चित्रीकरण/ फिल्म दाखवण्यात आली. कातराकडा आणि सह्याद्रीतील एकुणच सगळेच कडे कसे आडदाम्ड, उभे-आडवे विस्तारलेले, सरळसोट, रौद्र, भयावह आहेत याचे दर्शन या फिल्म मध्ये झाले. त्यातच एक भयानक अपघात देखील याच फिल्म मध्ये दाखवला आहे. सुदैवाने या अपघातामध्ये कुणालाही काहीच इजा झाली नाही. किरकोळ खरचटले मात्र. आरोहक कड्यावर वर वर चढण्याचा प्रयत्न करीत असतानाच, प्रमुख आरोहक कड्याच्या ज्या भागाला चिकटलेला होता तो संपुर्ण कड्याचा भागच निखळुन खाली पडला. तो पडताना नेमका खाली उभ्या असलेल्या आरोहकाला घासुन, आणखी खोल दरीत कोसळला. आणि खाली म्हणजे दुस-या क्रमांकावर जो आरोहक होता तो म्हणजे दुसरा तिसरा कुणी नसुन माझा मित्र यशदिप. या फिल्म मुळे आणि यशदिप वर गुदरलेल्या या भीषण अपघातामुळे कातराकडा पाहण्याची अतीव इच्छा निर्माण झाली होती. २००१ च्या उन्हाळ्यात आम्ही दोघांनीच रतनगड भटकण्याचे ठरवले व आम्ही निघालो. आम्हा दोघांचा नुकताच बेसिक माऊंटेनियरींग चा कोर्स झालेला होता. वय उमेदीचे होते. आनंद पाळंदेंचे डोंगरयात्रा म्हणजे आमची भगवदगीताच. त्यातील रतनगड ट्रेकच्या पानाचे व नकाशाचे झेरॉक्स करुन घ्यायचे, पुस्तकातील तो तो पाठ अनेकदा वाचायचा व मार्ग ठरवुन सुरुवात करायची. या शिवाय अन्य कसलीही साधने उपलब्ध नव्हती. आमचे नशीब चांगले की आमच्या आधीच्या पिढीने किमान तेवढे तरी करुन ठेवले होते. ज्यावेळी पाळंदे प्रभृती भटकत असतील तेव्हा त्यांच्याकडे तर पुर्वतयारी असे काहीही नव्हते. फक्त नाव तेवढे ठाऊक असायचे. त्यांनी असेच करीत करीत आख्खा सह्याद्री पाहिला, अनुभवला. एवढेच करुन ते थांबले नाहीत, तर त्यांना आलेल्या अनुभवांची शिदोरी देखील पुस्तक रुपाने आमच्या पिढील दिली, की जिच्या जीवावर आम्ही थोडेफार भटकु शकलो. त्यांच्या अनेक पुस्तकांमधुन अनेक किल्ले, कडे, पर्वत यांच्या विषयी सविस्तर माहिती त्यांनी नोंदली. नकाशे बनवले. वास्तु विशेषांची ओळख केली व ती देखील नोंदवुन ठेवली. वाटा-आडवाटा-माकडवाटा-चोरवाटा-फसव्या वाटा या विषयी लिहुन ठेवले. गडांवर पाण्याची स्थाने किती, कुठे हे सर्व लिहुन ठेवले. त्या पाण्याच्या स्त्रोतांमध्ये कोणत्या ऋतुंमध्ये पाणी उपलब्ध असते व ते पिण्यासाठी उपयोगाचे आहे की नाही हे देखील त्यांनी नोंदवुन ठेवले. राज्य महामंडळाच्या बसचे मार्ग, त्यांच्या वेळा हे सर्वच्या सर्व त्यांनी सविस्तर लिहुन ठेवले जेणेकरुन पुढच्यांची सोय व्हावी. असो. तर डोंगरयात्राचा अभ्यास करुन आम्ही रतन गड भटकंती योजली. आम्ही सतरा-अठरा वर्षांची पोरे होतो त्यावेळी. ईगतपुरी हे नाव पुस्तकात वाचुन ते म्हणजे फार फार दुर , अगदी मध्यप्रदेडामध्ये असलेले एखादे शहर आहे की काय आणि आपण एवढ्या दुर देशी जाणार आहोत, असे वाटले होते. आणि त्याकाळी सर्व प्रवास लाल डब्यानेच व्हायचा. दुसरे पर्यायच नव्हते. त्यामुळे पुण्यापासुन निघुन आम्ही रतनवाडीला पोहोचेपर्यंत जवळजवळ आठ तास आम्ही एस टी बस मध्येच होतो. एसटी बस ची एक विशिष्ट संस्कृती होती. आणि आमच्या सारखे कधीतरीच म्हणजे भटकंतीलाच एस टी बस मध्ये बसणारे देखील आपोआपच्या त्या एसटी बसच्या संस्कृतीशी जोडले जायचे. त्या बस प्रवासातील पुण्यापासुनचा प्रवास मला विशेष आठवतो, कारण आम्हाला बस मध्ये बसण्याला जागाच मिळाली नाही. तुडूंब भरलेली बस. अगदी चेंगराचेगंरीच. त्यातच आमच्या भल्यामोठ्या पाठीवरच्या पिशव्या. दररोजच्या जीवनसंघर्षात संकटांशी दोन हात करीत, ज्यांचे पाठ आणि पोट एक झालेले होते असे ते ग्रामीण लोक जेव्हा आमच्या पाठीवरच्या त्या भल्यामोठ्या पिशव्या पाहत तेव्हा त्यांतील काहींना असे वाटत असावे की हे आले बघा खुळे! डोंगरद-या फिरायला येतात. काय ठेवलय जणु त्या दगडधोंड्यांत. तर काहींना आमच्या पिशव्या पाहुन आमच्या विषयी थोडे अप्रुप वाटत असावे असे त्यांच्या चेह-याकडे पाहुन समजायचे. आमच्या सारखे भटके पाहणे त्यांना काही नवीन नसायचे. तर आमच्या पाठीवरच्या त्या मोठाल्या पिशव्यांमुळे आम्हाला उभे राहण्यासाठी देखील जागा मिळाली नव्हती. पर्याय नसल्याने ड्रायव्हर काकांनी आम्हाला त्यांच्या केबिन मध्ये घेतले. केबिन कसली राव ती. भट्टीच म्हणा की! आमच्या बुडाखालीच इंजिनची करकर,डरडर,घरघर आणि त्यातुन येणा-या झळा. आणि डिझेलचा वास तर विचारुच नका. कसे काय ते ड्रायव्हर मंडळी एवढे लांबचे पल्ल्याचे अंतर गाडी चालवीत असतील हे देव जाणो अथवा ते ड्रायव्हरच. जसजशी गाडी एकेक थांबा घेऊन पुढे जाऊ लागली तसतशी मागे गाडीत जागा होऊ लागली. पिशव्या तशाच तिथे ठेवुन आम्ही, संधी मिळताच मागे जाऊन उभे राहिलो. पण दोन-अडीच तास तरी आम्ही असे ड्रायव्हर शेजारी बसुन घालवले असतील. नकोसे झाले होते तेव्हा अगदी! रतनवाडीला पोहोचलो तेव्हा रात्र झाली होती. प्रत्यक्ष प्रवासातील आठ आणि बस बदलण्यासाठी स्थानकावर वाट पाहण्यात तीन तास असा आमचा पुर्ण दिवस नुसता एस टी/ एसटी आगारामध्येच गेला. मंदिर परिसरामध्ये एक ओसरी पाहुन आम्ही आमचे बस्तान मांडले. आम्हाला विचारायला कुणीही आले नाही. कारण त्यावेळी त्या गावांमध्ये , गावचे गाव पण होते. लोक आठ वाजेपर्यंतच जेवन उरकुन निजुन जात. अगदी एखाद दुसर चुकारीचा माणुस कधीमधी चौकशीला यायचा. व तो देखील काही मदत हवी आहे का पोरांना हे पाहण्यासाठीच यायचा. पण या वेळी मत्र कोणीच आले नाही. आम्ही सोबत आणलेली चपाती, शेंगदाण्याची चटणी खाऊन, पाय पसरले. प्रवासाचा शीण भयंकर होता त्यामुळे तातडीने झोप लागली. ज्यावेळी आम्ही इथे पोहोचलो तेव्हा भयानक अंधार असल्याने, आम्ही कुठे, कसल्या प्रदेशात आलो आहोत या विषयी काहीच कल्पना नव्हती. पहाटेला वस्तीतील कोंबड्यांच्या आरवण्याने लवकरच जाग आली. मंदीरात घंटा अधुन मधुन वाजत होती. कदाचित कुणीतरी पहाटे पहाटे दर्शनाला आले असावेत. जसजसा आसमंत प्रकाशित होऊ लागला तसतसा आम्हाला तो परिसर देखील प्रकाशित झालेला आम्हाला दिसला. घाटमाथा म्हणजे खुप जास्त पावसाचा भाग, इथे पाऊस तीन महिने नुसत पडतच असतो त्यामुळे मंदिराचे रंगरंगोटीचे काम सुरु असलेले आम्हाला सकाळच्या प्रकाशात दिसले. नंतर हे देखील समजले की हे काम पुरातत्व खात्यामार्फतच सुरु होते. सकाळचा चहा आणि नाश्ता आम्ही स्वतः बनविला. त्यासाठी थोडीफार लाकडे गोळा करावी लागली. चुल मांडुन आधी दुध पावडर पासुन दुध बनवुन घ्यावे लागायचे मग प्रत्यक्ष चहा. नाश्ता व जेवण बनविण्यासाठी आम्ही घरुन शिधा न्यायचो (अजुनही नेतो) . भाजलेला रवा, साखर, हळद, तिखट, मीठ अशी या शिध्याची एक यादीच आमची बनायची प्रत्येक ट्रेकच्या काही दिवस आधी. त्या सकाळी आम्ही गोड शिरा बनवला. नेहमीप्रमाणे शिरा चिकट चिकट झाला. साखरेचा अंदाज नेहमीच चुकायचा. पण त्यातही गोडी असायची, न्यारी चव असायची. तोंडावार थोडासा पाण्याचा शिडकावा करुन, सर्वात आधी मंदीर पाहिले. अतिशय सुंदर, सुबक असे ररतनवाडीचे मंदीर प्राचीन आहे. शिल्पकला, भिंतीवरील कोरीवकामे, मुर्तीकला अप्रतिम आहे. हल्ली सोयी वाढल्या आहेत तिकडच्या त्यामुळे जाणे-येणे, जेवण-खाण, मुक्काम आदी गोष्टी सोप्या झाल्या आहेत. ज्यांनी कुणी पाहिले नसेल हे मंदीर त्यांनी अवश्य पहावे. ट्रेकींगचा आणखी एक अलिखित नियम आम्ही ज्येष्टांकडुन शिकलो. तो म्हणजे पाण्याचा वापर कमीतकमी करणे. माझे शिक्षक गुलाब सपकाळ, यांचा तर नेमच होता ट्रेक पुर्ण होईपर्यंत चेह-याला पाणी लावायचे नाही. नेम म्हणजे नेमच. त्यात त्यांनी कधीही बदल केला नाही. त्यांचे ट्रेकींगचे कपडेदेखील ठरलेले असायचे. पुर्ण बाह्याचा सुताचा एक सदरा मला आठवतोय. हा सदरा फक्त ट्रेकिंगसाठीच ते
१९९४ मध्ये सुरु झालेले आमचे ट्रेकिंग आणि गडकिल्ले भटकंतीला आपोआपच आळा बसला, जेव्हा मी आय टी क्षेत्रामध्ये गेलो. सन २००२ पर्यंत छोटे छोटे ट्रेक तरी करीत असायचो कधी मित्रांसोबत तर कधी विद्यार्थ्यांसोबत. पण नंतर मात्र अजिबातच जमले नाही. करीयरच्या ओघामध्ये गडवाटा जणु अनोळखीच झाल्या. त्यानंतर २०१२ मध्ये एकदा, टेकमहिंद्रा मध्ये नोकरीत असताना हरिश्चंद्र गड करण्याचा योग आला. वैयक्तिक फिटनेस नव्हताच. त्यापुर्वी मी हरिश्चंद्रगड ४-५ वेळा सर केला होता विविध वाटांनी. पण यावेळी आमच्या ग्रुपमध्ये सर्वात शेवटचा, थकलेला गडी मीच होतो. कसाबसा गड चडुन मी गडावर, मुक्कामाच्या गुहेशेजारी पोहोचलो. पावसाळ्याचे दिवस होते. गडावर जणु जत्राच होती. किमान चार पाचशे लोक किल्ल्यावर मुक्कामाला असतील असे ती गर्दी पाहुन वाटले. आम्हाला मुक्कामाला जागाच मिळेना. कशीबशी एक छोटीशी गुफा शोधली व त्यात मुक्काम केला. Our Upcoming Events Feb 23 February 23 – February 25Nature Camp for Special KidsFind out more Mar 02 March 2 – March 3Stargazing near PuneFind out more Mar 08 March 8 – March 10Woman Only Nature & Adventure RetreatFind out more दुस-या दिवशी सकाळी सकाळी गडावर जे दृश्य पाहिले ते पाहुन, मनोमन पुन्हा त्या गडावर जायचेच नाही असे ठरवले. जे काही लोक मुक्कामाला होते त्यापैकी अक्षरशः एकाला देखील गड-किल्ल्यांचे विधीनिशेष माहित नव्हते. मल=मुत्र विसर्जन तस पाहता अगदी स्वाभाविक व नैसर्गिक क्रिया आहे. पण त्या दिवशी गडावर लोकांनी अक्षरशः जागा मिळेल तेथे, उघड्यावर मल विसर्जन करताना पाहुन खुपच विचलीत झालो. आपण गड-किल्ल्यांवर जातो कशासाठी? सह्याद्रीच्या विराट रुपाचे दर्शन घेऊन आपलेही जीवन असेच उन्नत व स्थिर करण्याची प्रेरणा कित्येकांना या ट्रेकिंगमधुन मिळत असते. वेल्ह्यातील गोप्या घाटाच्या माथ्यावर – वर्ष २००७ पण जेव्हा गड-किल्ल्यांच्या मस्तकांवर अशा प्रकारे कुठेही मलमुत्राचा अभिषेक होत असेल व त्यामुळे दुर्गंधी व घाण पसरत असेल तर अशा सह्याद्रीतील स्वर्गाकडे जाण्याचे इच्छा कधी होणारच नाही आपण किल्ल्यांवर जातो कशासाठी, सुंदर निसर्गाचा अस्वाद घेण्यासाठी कि सुंदर असलेल्या निसर्गाला विद्रुप, घाणेरडा करण्यासाठी? मागील महिन्यामध्ये राजगडाचा बालेकिल्ला वणव्यात जळाला. आणि दरवर्षी हे असे होतच असते. मी दरवर्षी राजगड, तोरणा या किल्ल्यांना जळताना पाहतो. आणि अगतिक होऊन पुढे निघुन जातो. गड किल्ल्यांवर ही जी आग लागते त्याचे कारण देखील निसर्गाच्या अलिखित नियमांची माहिती नसणे हे आहे. किल्ल्यावर मुक्काम केल्यावर दगडांच्या चुलीवर स्वयंपाक करावा लागतो. कित्येकदा शेकोटी पेटवली जाते. या चुल व शेकोटी मुळेच जास्त करुन किल्ल्याच्या डोंगरांना आग लागते. ज्या गड किल्ल्यांकडे आपण दैवत म्हणुन पाहतो, छत्रपती शिवरायांचे अधिष्टाण म्हणुन गड-किल्ल्यांना आपण वंदन करतो, ज्या गड–किल्ल्यांच्या अंगभुत नैसर्गिक सौंदर्याकडे पाहुन आपण मोहीत होतो, त्याच किल्ल्यांना आपणामुळे वणवा लागतो. वणवा लागल्यामुळे निसर्गाचे जेवढे नुकसान होते तेवढे अन्य कशानेही होत नाही. मागील पावसाळ्यात जर एखादे रोपटे जन्माला आले असेल तर फेब्र-मार्च पर्यंत वीतभर तरी वाढलेले असते. त्या रोपट्यास यापुढे पाण्याची देखील आवश्यकता नसते. त्याची मुळे जमिनीत खोलवर गेलेली असतात. पण अशातच जर वणवा लागला तर ते ठामपणे, ऊन वारा अंगावर घेणारे रोपटे वणव्यात अक्षरशः होरपळुन जाते. आणि दरवर्षी अगदी हेच होतेय. त्यामुळेच आपणास किल्ल्यांवर नवीन झाडे, वृक्ष तयार झालेले दिसत नाहीत. सह्याद्रीमध्ये भटकंती करताना जर तुम्हाला वणवा पेटलेला दिसला तर त्वरीत १९२६ (1926) या फॉरेस्ट हेल्पलाईन वर फोन करुन वर्दी द्यावी. दौलताबाद किल्ल्यास लागलेल्या वणव्याचा फोटो आपण किल्ल्यांवर जातो कशासाठी, सुंदर निसर्गाचा अस्वाद घेण्यासाठी कि सुंदर असलेल्या निसर्गाला विद्रुप, घाणेरडा करण्यासाठी? त्याचे नुकसान करण्यासाठी? गड-किल्ल्यांवर प्लास्टीकचे खच सापडतात. दारुच्या बाटल्या सापडतात. काय हे? काही निस्सीम निसर्गप्रेमी – दुस-यांनी केलेला कचरा साफ करताना मग प्रश्न असा येतो की किल्ल्यांवर जास्त लोक जाण्यायेण्याने मलमुत्र विसर्जन किल्ल्यांवर होणारच, वणवे लागणारच, प्लास्टीकचे ढिग तयार होणारच तर काय लोकांनी किल्ले भटकंती करुच नये? अवश्य करावी. पण ती करताना खालील गोष्टींचे भान अवश्य ठेवावे. या लेखात मी जे पुढे लिहिणार आहे ते आजवर अलिखित नियम होते निसर्गाचे. निसर्गाचे विधीनिषेध होते. आपण सर्वांनी याचे काटेकोरपणे पालन करणे खुप आवश्यक आहे. तुम्हाला ट्रेकिंगची आवड आहे? तुम्ही गडकोटांचा अभ्यास करता? तुम्हाला सह्याद्रीची भटकंती करायला आवडते? तुम्ही एखादा ट्रेकिंग ग्रुप चालवता? तुम्ही विविध ट्रेक ऑर्गनाईज करता? यापैकी एकाही प्रश्नाचे उत्तर हो असेल तर इथुन पुढ तुम्ही जे काही वाचणार आहात ते वचन तुम्ही स्वःतस सह्याद्रीला द्या. सह्याद्री नुसता दगड धोंड्याचा बनलेला नाहीये. त्यात चैतन्य आहे. त्याकडे शौर्य आहे, तो संवेदनशील आहे, तो रौर्द्र आहे, त्याकडे एक स्वतंत्र नवनिर्माणाची क्षमता आहे. सह्याद्री जिवंत आहे. व तुम्ही जर सह्याद्रीस वचन दिले तर सह्याद्री आनंदुन जाईल. १. गड-किल्ल्यांवर, ट्रेकिंगला जाताना प्लास्टीक नेणे बंद करावे. आपला जो काही कचरा तयार होईल , तो आपण माघारी घेऊन यावे. कित्येकदा हॉल्स किंवा अशाच प्रकारच्या चॉकलेटचे रॅपर्स पायवाटांवर दिसतात. आपण किमान त्यात आणखी भर घालु नये. ट्रेक कसे करावे? काय आहेत ट्रेकिंगचे अद्याप न लिहिलेले नियम? २. सह्याद्रीचा कप्पा तयार करा. ज्येष्ट ट्रेकर श्री आनंद पाळंदेच्या डोंगरयात्रा नावाच्या, पुस्तकामध्ये त्यांनी एक खुप मुल्य असलेले वाक्य लिहिले आहे. “निसर्गातुन चालताना पावलाच्या ठश्यांशिवाय मागे काही ठेवु नका व सुखद आठवणींवाचुन काही नेऊ नका !”. मी यापुढे जाऊन आवाहन करतो सर्व ट्रेकर्सना कि चुकुन किल्ल्यावर काही प्लास्टीक सापडलेच, तर त्यातील थोडेतरी आपणासोबत शहरात घेऊन यावे. यासाठी आपल्या ट्रेकिंगच्या सॅक मध्ये एक खास कप्पा करावा, सह्याद्रीसाठी. व प्रत्येक वेळी किल्ल्यावरुन थोडा का होईना कचरा कमी करावा. प्रफुल्लता प्रकाशनचे, आनंद पाळंदेंनी लिहिलेले पुस्तक डोंगरयात्रा ३. दगडाची चुल करताना, ती चुल मोकळ्या मैदानात करु नये., गवताच्या मैदांनापासुन, दुर अंतरावर चुल करावी. चुल पेटवण्याच्या अगोदरच चुलीच्या चारही बाजुंचे सर्व गवत काढुन घ्यावे. शेकोटी बाबतीत देखील असेच करावे. शक्य झाल्यास, हल्ली चुल करणे टाळावे. हल्ली अगदी छोटे छोटे , ने आण करण्यास सोपे व वजनाने हलके गॅस वर चालणारे स्टोव्ह सहज ऑनलाईन उपलब्ध होतात. शक्यतो त्यांचा वापर करावा. यामुळे आपण वृक्षतोडी देखील टाळु शकतो. सह्याद्रीमध्ये भटकंती करताना जर तुम्हाला वणवा पेटलेला दिसला तर त्वरीत १९२६ (1926) या फॉरेस्ट हेल्पलाईन वर फोन करुन वर्दी द्यावी. आजुबाजुचे गवत काढुन मगच चुल पेटवावी ४. ट्रेकिंगचा सदस्य संख्या नेहमी ८ पेक्षा जास्त होऊ द्यायची नाही. यामुळे जो कोणी म्होरक्या असतो, त्याला सर्वांवर लक्ष ठेवणे सोपे जाते. व अपघात टाळले जातात. मोहीमेचा एक म्होरक्या नक्की असावा. त्याचा शब्द शेवटचा असावा. काही बाबतीत सदस्यांचे मतभेद होऊ शकतात. पण म्होरक्या जो काही निर्णय घेईल तो सर्वांनी अमलात आणण्याची तयारी सदस्यांची असावी. म्होरक्या अनुभवी, इतिहास-भुगोलाविषयी माहिती असलेला, त्यातल्यात्यात जाणकार असावा. सर्वानुमते म्होरक्या ठरवणे, प्रत्येक ट्रेकच्या सुरुवातीच झाले पाहिजे. असे केल्याने सर्वच सदस्य म्होरक्याच्या नजरेच्या टप्प्यात राहतील व अपघात होण्यास प्रतिबंध बसेल. जास्त सदस्य संख्या असेल तर पुढे चालणारा व शेवटी चालणारा यांच्या मध्ये खुप मोठे अंतर पडते. आम्ही ट्रेकींगला सुरुवात केली तेव्हा म्होरक्या सोबतच प्रत्येक वाटचालीच्या वेळी सर्वात पुढे चालणारा जबाबदार मावळा व शेवटी चालणारा जबाबदार मावळा देखील नेमण्याचा प्रघात आनंद पाळंदे, गुलाब