होते आहे ते कधीही भरुन न येणारे नुकसान आहे. त्यामुळे विद्युत दाहिनी मध्ये अंत्यसंस्कार पुढारलेपणाचे, पुरोगामीपणाचे लक्षण नाही हे समजलो.
मागील वर्षी मी तोरणा किल्ल्यावर असताना मला एका कारवीच्या पानावर एक किटक दिसला. मला वाटले की हा मृत किटक असावा. पण शंका आली की मृत असला तरी केवळ त्याच्या शरीराचे बाह्य आवरणच कसे काय बरे शिल्लक आहे, आतील बाकीचे शरीर कुठाय?
तुम्ही जर कधी पावसाळ्यात गडकिल्ले भटकंती केली असेल, अथवा ऑगस्ट-सप्टेंबर मध्ये तुम्ही कधी सह्याद्रीच्या घाट रस्त्याने गेला असाल तर कदाचित तुम्हाला सह्याद्रीच्या पावसाळ्यातील पुष्पोत्सवाची पुसटशी कल्पना आहे असे म्हणावे लागेल. मी पुसटशी म्हणतोय ते एवढ्यासाठी की एका वर्षाविहारात अथवा एकदा घाटरस्त्याने गाडी चालवत जाऊन सह्याद्रीच्या पुष्प भांडाराची खरोखर केवळ पुसटशीच कल्पना येऊ शकते. याचे कारण असे आहे सह्याद्रीचे हे पुष्पभांडार असीम आहे. हे पुष्पभांडार इतके समृध्द आहे की काही वनस्पती, रानफुले अगदी केवळ काही तासांसाठीच फुलतात तर काहींचे आयुर्मान काही दिवसांचे असते. त्यामुळे नेमके आपण निसर्गात जातो तेव्हा त्या त्या वनस्पती बहरलेल्याच असतील याची शाश्वती नसतेच मुळी. असो पण एकदा का होईना जर तुम्ही सह्याद्रीच्या फुलांचा बहर पाहिला असेल तर तुम्हाला स्वर्गसुखाचा अनुभव आला असेल यात मुळीच शंका नाही. पण मित्र-मैत्रिणींनो सह्याद्रीवरील या फुलांचा बहर काय केवळ सौंदर्याचा आस्वाद मानवाने घ्यावा म्हणुनच नसतो बर का! सह्याद्रीची आपली स्वतःची एक परिस्थीतीकी म्हणजे इकोसिस्टीम आहे. या योजने मध्ये निसर्गातील प्रत्येक घटक आपापले कार्य अगदी न चुकता जसे करणे गरजेचे आहे तसे करीत असतो. कधी काळी मनुष्य देखील याच योजनेचा एक भाग होता. निसर्गचक्रामध्ये ढवळाढवळ मनुष्य करीत नसे. निसर्गातुन जेवढे गरजेचे आहे तेवढेच काय तो घ्यायचा. व ते घेताना देखील निसर्गाचे शोषण होणार नाही याची काळजी घेतली जायची. ही काळजी कशी घ्यावी याचे ज्ञान एका पिढी कडुन पुढच्या पिढी कडे देण्याची अलिखित अशी योजना होती, योजना असली तरीही ती अगदी सहज होती. केना नावाची एक गवतवर्गीय वनस्पती सह्याद्रीत या दिवसांत फुलली आहे. हे फुल खुपच सुंदर दिसते. काही दिवसांपुर्वी मी असाच एका डोंगरावर भटकंती करीत असताना गाई-गुरे चरताना पाहिली.  चरताना गाय जे खात होती ते काही निवडुन घेत नव्हती. एका घासात जे काही गवत जीभेत धरता येईल तेवढे ती घेत होती. तिच्या प्रत्येक घासात गवतासोबतच सोनकी, जांभळी चिरायत व केना हे देखील ती खात होती. या केना वनस्पतीच्या पानांची भाजी पुर्वापार मावळातील लोक करीत आले आहेत. केना अतिसारावर उपयोगी आहे. याची भाजी खाल्ली तर घशाचे दुखणे, खवखवणे कमी होते. डोळ्यांचे व त्वचेचे विकार कमी होण्यास या भाजीच उपयोग होतो. काविळीवर उतारा म्हणुन देखील याच्या पानांचा रस वापरला जायचा. भाजलेल्या ठिकाणी याच्या पाने ठेचुन लावल्यास जखम लवकर भरुन येते. मुळे पोताच्या आरोग्यावर लाभदायक आहेत. साप चावल्यास देखील याच्या पानांचा रस पाजला जायचा कारण हे उत्तम रेचक आहे.  याच्या फुलांपासुन पुर्वी रंग देखील बनविला जायचा. तर मित्रांनो एवढी औषधी वनस्पती आपले पुर्वज भाजी करुन तर खायचेच पण गाईने खाल्ल्यामुळे तिच्या दुधातुन देखील या वनस्पतीच्य औषधी गुणधर्मांचा उपयोग मनुष्यास व्हायचा. गाई-गुरे अशा कितीतरी रानफुलांच्या वन्स्पतीं खातात. पुर्वी माणसाला गाई-गुरे सांभाळण्यात पैसा महत्वाचा नसायचा म्हणुन घरी दुध-दुभते व त्यासोबतत निरामय आरोग्य देखील असायचे. पण आता सर्वकाही पैशात मोजण्याचा संस्कार नव्या शिक्षण पध्दतीने केल्याने पैशाच्या परिभाषेतच नफा-तोटा यांचा विचार करुन गाई-गुरे सांभाळणारे व त्यांना रानावनांत चरायला घेऊन जाणारे अगदी नावालाच शिल्लक राहिले आहेत. सह्याद्री मध्ये येणारा हा रानफुलांचा बहर निसर्गाच्या महान योजनेचा भाग आहे. आपण कधीकाळी या योजनेचा भाग होतो. पण आता आपण केवळ दर्शक राहिलो आहोत. जेव्हापासुन मनुष्य या योजनेमधुन बाहेर पडला, त्रयस्थ झाला, केवळ दर्शकच झाला तेव्हापासुन मनुष्याकडून सह्याद्रीच्या या श्रीमंतीचे शोषण सुरु झाले आहे. हे शोषण अवैध उत्खणनातुन सुरु आहे. असे उत्खणन अनेक कारणांनी सुरु आहे. कुणीतरी जमिनीचे खरेदीविक्री करणारे व्यावसायिक, त्या त्या जमिनी अधिक सपाट दिसाव्यात म्हणुन सर्रास बुलडोझर फिरवुन सह्याद्रीच्या या रानफुलांच्या, गवतांच्य, झुडूपांच्या, वेलींच्या समुळ नायनाटास, समुळ उच्चाटनास कारणीभुत होतात. तर कुणी फार्म हाऊस बांधण्याच्या नादात डोंगरउतारांना सपाट करतात. असे केल्याने माती वाहुन तर जातेच पण तिथला निसर्ग देखील स्थलांतरीत होत असतो. स्थानिक जाती-प्रजातीच्या झाडा-झुडूपांना समुळ काढुन परदेशी अथवा त्या त्या भागाशी तादात्म्य नसलेली झाडे लावल्याने देखील निसर्गाचे अपरिमित नुकसान होत असते. सह्याद्रीच्या संरक्षणासाठी सम्वर्धनासाठी ज्याप्रमाणे वृक्षलागवडीची गरज आहे तसेच गवताच्या माळरानांची देखील आवश्यकता आहे. त्यामुळे सर्रास सगळीकडे झाडे लावलीच पाहिजे असे ही नाही. पर्यावरण संरक्षण, संवर्धन हा तस पाहता हल्ली खुप मोठा विषय झाला आहे. या विषयात लोक डॉक्टरेट मिळवितात. म्हणजेच काय तर पुर्वी जे ज्ञान एका पिढीकडुन दुस-या पिढीकडे सहज हस्तांतरीत व्हायचे ते आता विद्यापीठांतुनच मिळते व तेही सर्वांना नाही.  किती ना विरोधाभास हा. काय आपण खरोखरी प्रगती केली आहे की आपण आधुनिकतेच्या नावाखाली घरातील डॉक्टरेट चे ज्ञान व आचरण संपविले आहे. सर्वांनी यावर विचार करणे आवश्यक आहे. हल्ली सह्याद्रीतील या रानफुलांच्या बहराचे, पुष्पोत्सवाचे खुपच जास्त कौतुक आहे. आणि का असु नये बरे? ज्या योजनेचा मनुष्य कधीकाळी एक घटक होता त्या योजनेचे आता आपण फक्त दर्शक बनुन राहिलो आहोत. शहरातील लोकांना याचे खुपच जास्त अप्रुप असते. तेवढे कौतुक गावाकडील लोकांना, मुलांना नसते. ग्रामस्थांना ओढ असते शहरी जीवनशैली जगण्याची. त्यांना कौतुक असते या फुलांचे फोटो काढण्यासाठी येणा-या पर्यटांकांच्या झगमग कपड्यांचे, आलिशान गाड्यांचे, गॉगल्सचे, कॅमे-यांचे. निसर्गाचा हा ठेवा ज्यांनी जपला पाहिजे ते निसर्गाच्या या महान भांडारापासुन मनाने व काहीसे शरीराने देखील कधीच दुर निघुन गेले आहेत. सह्याद्रीचे हे पुष्पवैभव प्रत्येक गावागावात, प्रत्येक वाडीवस्तीवर जरी मुबलक असले तरी त्याविषयी आत्ताच्या पिढ्या उदासिन आहेत. हे वास्तव आहे. खरतर सह्याद्रीच्या द-याखो-यात असणा-या शाळांमध्ये , गावातील वयस्कर लोकांकरवी निसर्गसंस्काराचे शिक्षण देणे सुरु केले पाहिजे. आणि करण्यासाठी कसल्याही आयोगाच्या शिफारशीची गरज नसावी. हा लेख वाचणा-यांस, लिहिणा-यास जर याचे महत्व पटले असेल तर स्थानिक पातळीवर आपण हा प्रपंच सुरु केला पाहिजे. सह्याद्रीतील प्रत्येक शाळा निसर्गशाळा झाली पाहिजे. जर कुणा शिक्षकांना, ग्रामस्थांना या संदर्भात काही मदत, माहिती, कार्यपध्दती हवी असेल तर आम्ही सदैव तत्पर आहोत. कदाचित एवढे सगळे वाचता वाचता तुमच्या एव्हाना हे लक्षात आले असावे की अशा लेखांना, विचारांना प्रसारीत करायचे असेल तर ते शहरातील वाचकांपर्यंत जेवढे पोहोचतील त्यापेक्षा जास्त ग्रामीण भागातील वाचकांपर्यंत पोहोचविले पाहिजेत. निसर्ग, पर्यावरण यांचे संरक्षण-संवर्धन ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. आपापल्या परीने आपण ती पार पाडली पाहिजे. सह्याद्रीच्या रा रानफुलांचे दर्शन पुनः एकदा घ्या फोटो सफरीतुन..
Gopal in Sahyadri
आज प्रत्येकाला गोपाळ होता नाही येणार, २४ तास निसर्गाच्या सान्निध्यात नाही घालवता येणार. पण आपल्या अत्यंत छोट्या छोट्या गोष्टी देखील वसुंधरेच्या व मानवजातीच्या हितासाठी खुप महत्वाच्या व परिणामकरक सिध्द होऊ शकतात.
डोंगर उतार तसेच माळरानांवर सर्वत्र आढळुन येणारी ही वर्षायु वनस्पती पावसाळ्याच्या शेवटास सर्वांचे लक्ष वेधुन घेते. विविध रंगांची फुले येणा-या प्रजाती यामध्ये आहेत. एखाद्या माळावर अथवा डोंगर उतारावर एकाच रंगाच्या फुलांनी बहरलेले तेरड्याचे ताटवे त्या ठिकाणाला रंगीत करुन टाकतात. गौरी गणपतीच्या दिवसांत तोरणा किल्ल्याचे डोंगर उतार गुलाबी रंगाने रंगविले जातात ते याच फुलांच्या बहराने. शेकडो-हजारो किंवा लाखो वर्षे झाली असतील कदाचित ही वनस्पती तिचे अस्तित्व टिकवुन आहे. दरवर्षी गाई-गुरे-म्हशी-शेळ्या मेंढ्या चरतात, डोंगर-उताराला, माळरानांना वणवे लागतात तरीदेखील या वनस्पतीचे अस्तित्व अद्याप टिकुन आहे. पिकलेल्या फळातुन/ शेंगातुन खाली पडलेले बीज वणव्यासमोर देखील टिकतात व रुजतात. या वनस्पतीला भारताच्या अनेक भाषांमध्ये वेगवेगळी नावे आहेत. महाराष्ट्रात मात्र सर्वत्र तेरडा याच नावाने ओळख आहे. इंग्रजी मध्ये balsam, impatiens, jewel weed, ladies’ slippers, rose balsam, spotted snapweed अशा अनेक नावांनी याला ओळ्खले जाते. शास्त्रीय नाव impatiens-balsamina असे आहे तर मराठी मध्ये तेरडा नावा व्यतिरिक्त गुलमेंधी हे देखील नाव काही ठिकाणी (गुजरात जवळचा भाग) वापरले जाते. कोकणात चिर्डा, तेरडा म्हणतात. संस्कृतात दुष्परिजती असे नाव आहे. कश्मिरी भाषेत बन-तिल किंवा ततूर म्हणतात. बंगाली मध्ये दोपाती, गुजराथी  -गुलमेंधी, हिंदी – गुलमेहंदी, कन्नड – कर्ण-कुंडल, मल्यालम मध्ये थिलम अशी वेगवेगळी नावे भारतात वापरली जातात. साधारण गवताचे जसे आयुष्य असते तसेच याचे असते. पाऊस पडायला सुरुवात झाली की मागील वर्षी वा-यासोबत इतस्तत पसरलेले बीज अंकुरतात. गौरी गणपती च्या आसपास फुलांचा बहर असतो. एक फुल एकदा फुलले की ते तीन ते चार दिवस फुललेले राहते. एका झाडास डझनपेक्षा जास्त फांद्यांना फुले येतात. कालांतराने या फुलांच्या शेंड्यांना शेंगा येतात. शेंगा अगदी छोट्या असतात व जसजशा पक्व होऊ लागतात आंत मध्ये बीज देखील तयार होतात. बीज खुपच छोटे म्हणजे खसखस च्या आकारापेक्षाही छोटी असतात. शेंगा परिपक्व झाल्यावर त्यांना अगदी हलकासा स्पर्श जरी झाला तरी फट असा हलका आवाज येऊन ही शेंग टचकन फुटते व बीज विखुरतात. लहान मुलांचा हा आवडता खेळ! यामुळेच याचे बीज संकलन अवघड होऊन जाते. शेंगा फुटण्याच्या या पद्धतीमुळेच या वनस्पती ला इंग्रजीमध्ये टच-मी-नॉट असे देखील म्हणतात. तिकडे इंग्रजीमध्ये touch me not असे ‘लाजाळु या अर्थाने’ म्हंटले जाते. आपण म्हणतो व ओळखतो ती लाजाळु वनस्पती वेगळीच आहे व ती सर्वांना माहीत आहे देखील आहे. जेव्हा ही वनस्पती नवीननवीन उगवते तेव्हा याचे कोवळे देठांची व पानांची भाजी केली जाते असे पीएफएएफ या संकेतस्थळावर समजते.  याच संकेतस्थळानुसार याच्या पानांचा रस मोस/चामखीळ घालवण्यासाठी वापरतात तर फुले शीत असल्याने भाजलेल्या जखमेवर गुणकारी आहे असे समजते. फुलांचा रस सर्पदंशावर वापरतात मात्र असा वापर भारतात कुठे केला जातोय हे मात्र स्पष्ट होत नाहीये. बीजांचा उपयोग कर्करोगाच्या उपचारांत देखील करतात तसेच गरोदर महिलेला प्रसुती वेदना येत असताना ताकत यावी म्हणुन देखील बीयांची भुकटी दिली जाते. (कुणीही वैद्यकीय सल्ल्याशिवाय केवळ या लेखाच्या आधारे तेरड्याचा किंवा अन्य कोणत्याही वनस्पतीचा उपयोग औषधासाठी करु नये) हे सर्व उपयोग खरोखरीच महाराष्ट्रात भारतात कुठे केले जातात का याविषयी संशोधन होणे गरजेचे आहे. कदाचित असे उपयोग केले जात असतील पुर्वी पण आपण ते ज्ञान गमावुन बसलो आहोत की काय असे वाटु लागले आहे. ही एक औषधी वनस्पती आहे पण अद्याप यावर भारतात संशोधन नीटसे झाले नाही असे दिसते. भारतात मुबलक प्रमाणात आढळणा-या वनस्पतीच्या औषधी गुणधर्मांचा अभ्यास करुन जर उपयुक्त अर्क अथवा अवयव वापरण्याचे तंत्र विकसित झाले तर लाखो लोकांस रोजगार मिळु शकतो. या व्यतिरीक्त परसबागेत अथवा बागेत लावण्यासाठी देखील आपल्याकडे याचा वापर केला जातो. कास पठारावर फुलणारे या फुलांचे ताटवे मन मोहुन टाकतात. गौरी गणपतीमध्ये घरात गौरी बसवताना आवर्जुन तेरडादेखील गौरी शेजारी ठेवला जातो. याचाच एक प्रकार म्हणजे पान तेरडा (Impatiens Aculis Dalz. /  rock balsam) ही वनस्पती देखील मोहक आहे. पान तेरडाचे वैशिष्ट्य असे की ही वनस्पती खडकावर वाढते. पान-तेरड्याचा मी तोरणागडावर काढलेला फोटो खाली आहे. याचाच एक दुरचा भाऊ/बहीण म्हणजे हिमालयन बालसम (Impatiens Glandulifera). काही देशांत हिमालयन बालसम लावण्यास बंदी आहे कारण हे खुप वेगाने पसरते. पांध-या, लाल, जांभळ्या, गुलाबी रंग असलेली तेरड्याची फुले मी पाहिली आहेत. तुमच्या कडे अजुन विशेष माहिती असेल तेरड्याविषयी तर अवश्य कमेंट मध्ये अथवा माझ्या व्हॉट्सॲपवर कळवा जेणे करुन आपण ती माहिती जतन करुन ठेवु! तुमच्या भागात तेरड्याचा काही विशेष उपयोग परंपरागत खाद्य अथवा औषध म्हणुन केला जात असेल तर अवश्य कळवा.