जरा जपुन, खेकडा आहे तो !

आपला सह्याद्री अनेक गोष्टींसाठी प्रसिध्द आणि आकर्षणाचा केंद्रबिंदु आहे. सह्याद्रीच्या कुशीत वसलेली, बहरलेली संस्कृती कशी होती, कशी आहे या विषयी आपण एका लेखामध्ये माहिती घेतली आहेच. तुम्हाला सह्याद्री व त्याची संस्कृती विषयीचा लेख वाचायचा असेल तर इथे क्लिक करा. सोबतच आपण सह्याद्री मधील विविध बेडकांच्या जाती-प्रजाती विषयी देखील माहिती घेतली आहे. सह्याद्रीच्या रानावनांत कोणकोणत्या भाज्या (रानभाज्या) उगवतात व त्या बनवाव्या कशा या विषयी देखील आपण सविस्तर माहिती घेतली आहे. पश्चिम घाटातील बेडुक देखील अभ्यासाचा विषय आहे. या विषयी अधिक माहिती इथे क्लिक करुन मिळेल.

आज आपण सह्याद्री तील आणखी एका वैशिष्ट्यपुर्ण जीवा विषयी माहिते करुन घेणार आहोत. तो म्हणजे सह्याद्रीतील खेकडा!

माझा ट्रेकिंग पार्टनर अरविंद एक भला मोठा मुठा हातात घेऊन..

आपल्या शहराच्या मावळ पट्ट्यात आढळणा-या दोन मुख्य खेकड्याच्या जाती म्हणजे मुठा खेकडा व काळा खेकडा या होय. पावसाळा सुरु होण्यापुर्वी दुर्गम भागातील लोक जीवनावश्यक सामग्रीची खेरेदी करुनच ठेवतात यात किराणा माल मुख्य असतो. याचे कारण असे की पावसामुळे तालुक्यच्या ठिकाणी जाणे त्यांना शक्य नसते. या सामग्री सोबतच मोट्या प्रमाणात सुकी मासळी देखील विकत घेतली जाते. रानभाज्या व परसबागीतील भाज्यांमुळे फायबर, विटामिन इत्यादींची पुर्तता होते पण प्रोटीनसाठी सुकी मासळी, नदी-नाल्यातील मासे, खुबे व खेकडे यांच्यावर अवलंबुन राहावे लागते. खेकड्यांमुळे भातखाचरांना देखील नुकसान होऊ शकते. भाताची रोपे लहान असताना, खेकडे ही रोपे खाऊ शकतात व त्यामुळे शेतक-यांची मेहनत वाया जाते. त्यामुळे देखील शेतीच्या आसपासच्या परीसरातील खेकडे पकडणे शेतक-यांसाठी अनिवार्य होऊन जाते.

मुठा जातीचा खेकडा

मी खेकड्यांचा व संस्कृतीचा काही संबंध आहे का हे तपासण्याचा प्रयत्न केल्यावर मला समजले की महादेव कोळी या समाजामध्ये बाळंतिण पुजे मध्ये खेकड्याचा नैवेद्य दाखवण्याची प्रथा काही भागात आहे. तसेही अन्न पुरवठा म्हणुन खेकड्यांचा वापर हा देखील संस्कृतीचाच एक भाग आहे.

खेकडा, या विषयावर देखील संशोधनास खुप वाव आहे. ज्याप्रमाणे समुद्रकिनारी खेकड्याची शेती केली जाते त्या प्रमाणेच, पश्चिम घाट माथ्यावर, जिथे खुप जास्त पाऊस पडतो, अशा भागात, जमिनीवरील खेकड्यांची शेती करण्यासाठी खुपच पोषक वातावरण आहे. यामुळे हजारोंच्या संख्येने रोजगार निर्मिती होऊ शकेल. तरुण पिढीने, अभ्यासकांनी, धोरणे बनविणा-यांनी या विषयाकडे देखील लक्ष दिले पाहिजे.

आपली कॅम्पसाईट ज्या भागात आहे तिकडे खेकडे पकडण्याचे काम अगदी प्रत्येक घरातील माणसे करतात. प्रत्येक घरी आठवड्यातुन किमान एकदा तरी खेकड्याचे कालवण होतेच होते. खेकडे पकडण्यासाठी (आणि मासे देखील) ही मंडळी एका विशिष्ट साधनाचा उपयोग करतात. हे बांबुचे बनविलेले असते. याला गडदे/गडद असे म्हणतात. या गडद्यामध्ये खेकड्यांसाठी काहीतरी खाद्य टाकले जाते जसे गांडुळ, चिकनचे आतडे, खेणखतातील मोठाले गोल किडे, इत्यादी. खेकडे या गडद्यामध्ये आले की त्यांना बाहेर पडता येत नाही त्यातुन. तुम्ही जर कधी आमच्या कॅम्पसाईट ला आलात तर आवर्जुन गडदे कसे असते हे पहा.

लहान मुले देखील खेकडे पकडु शकतात.

त्यासोबत खेकडे पकडण्यासाठी आणखी एक पध्दत वापरतात. ती म्हणजे एखाद्या लांब काठीच्या टोकाला गांडुळ अथवा खेकड्याचे कोणतेही खाद्य बांधुन, त्या काठीचे टोक खेकड्याच्या बिळात घालायचे. खाद्याच्या वासाने खेकडा, ते खाद्य खाण्यासाठी त्या काठीला पकडण्याचा प्रयत्न करतो. काठीला थोडे हिसके बसले की पकडणाराला समजते की खेकडा आहे असे. मग हळु हळु ती काठी वर वर उचलायची. काठीच्या पाठोपाठ खेकडा देखील बाहेर येतो, मग चतुराईने, खेकड्याला, त्याच्या पाठीच्या बाजुने पकडायचे. हाताने पकडने हे थोडे जिकीरीचे काम आहे. खेकडा विषारी जरी नसला तरी त्याचा चावा मजबुत असतो. त्यामुळे तुम्हला जर खेकडा हाताने पकडण्याचे कसब माहित नसेल तर त्यापासुन लांब थांबलेले कधीही शहाणपणाचे होय.

खालील व्हिडीय मध्ये पहा गडद्यामध्ये खेकडा पकड्याची पध्दत!

खेकड्याचे कालवण (कालवण म्हणजे रस्साभाजी)

माझे वडील, आम्हाला एक किस्सा नेहमी सांगायचे. माझ्या आईचे माहेर म्हणजे वारकरी कुटुंब. माहेरी त्यांच्याकडे वशाट कधी कुणी केले ही नाही आणि खाल्ले ही नव्हते. लग्नानंतर, बाबुजींनी (वडीलांना आम्ही बाबुजी म्हणायचो!) एकदा खेकडे आणले घरी व आईला कालवण करायला सांगितले. मटण शिजवतात तसे तिने खेकडे, आधी शिजायला ठेवले. पाच मिनिटे गेली, दहा मिनिटे गेली, अर्धा तास, एक तास होऊन गेला, तरीही खेकडे काही शिजेनाच. आई वेळोवेळी हाताने , पातेल्यातील खेकडे दाबुन पहायची. बाबुजींनी विचरले झाले का कालवण, त्यावर ती म्हणाली की खेकडे शिजतच नाहीत. अजुनही कडकच आहेत. तिच्या या उत्तरावर बाबुजींनी कपाळावर हात ठेवला व तिला खेकडा कसा शिजवतात हे शिकवले.

तर खेकड्याचे कालवण करणे व ते देखील चवदार, ही एक कलाच आहे. ग्रामीण भागात, प्रत्येक घरात या कलेतील पारंगत गृहीणी अजुनही आहेत. इतक्या वर्षात माझी आई जसे खेकड्याचे कालवण तितके चवदार मी इतरत्र कुठेही खाल्लेले नाही. माझ्या आईच्या हातचे खेकड्याचे कालवण आणि घुग-याचे (काळे घेवडे) कालवण खायला मिळण्यासाठी भाग्य लागते बरका!

खालील व्हिडियोमध्ये पहा, खेकड्याचे कालवण करण्याची कोकणी पध्दत.

आमच्याकडे कॅम्पिंग ला आलात व खास आग्रह केलात तर आपण मिळुन खेकडे पकडण्यासाठी जाऊ शकतो ;).

आमचा हा लेख तुम्हाला आवडला असेल तर अवश्य शेयर,फॉरवर्ड करा.

आपला

हेमंत सिताराम ववले

निसर्गशाळा, पुणे.

Our Upcoming Events

There is no Event

Facebook Comments

Share this if you like it..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *