अश्विन तमो-मेघ : अंतराळातील काळाकुट्ट मेघ
काल परवाच मी हॉर्स हेड नेब्युला विषयी लिहिलं आहे. त्यात जो फोटो वापरला आहे तो रोहीत पटवर्धन यांनी निसर्गशाळा येथुन काढला आहे. आज जेव्हा मुज्तबा यांनी काढलेला फोटो पाहिला तेव्हा या हॉर्स हेड विषयी अधिक जाणुन घेण्याची इच्छा झाली आणि शक्य तितकी माहिती वाचली. ती माहिती वाचल्यावर मला हॉर्स हेड ला तेजोमेघ म्हणने म्हणजे त्याच्या असण्याला , जसे आहे तसे असण्याला न्याय न देण्यासारखे आहे.
आपल्याकडे नामकरण करताना अनेक गोष्टींचा विचार केला जायचा. एकतर नक्षत्रांचा विचार पुर्वी केला जायचा आणि दुसर म्हणजे नवजाताचा रंग कसा आहे, रुप कसे, नाकी-डोळी कसे आहे याचाही विचार केला जायचा.
मी जेव्हा प्राचीन भारतीय खगोलाचा अभ्यास सुरु केला, तेव्हा मला अनेक गोष्टींची उकल होत गेली. त्यातच मला अश्विन या शब्दाचा/नावाचा अर्थ देखील समजला. पुराणांमध्ये अश्विन शब्दाचा अर्थ असा येतो की अश्वमुख असलेला तो अश्विन व असलेली ती अश्विनी होय.
आज हे सांगायच कारण म्हणजे आज आपल्या निसर्गशाळा कॅम्पसाईट वरुन मुज्तबा नावाच्या एका हौशी फोटोग्राफरने अंतराळातील एका तेजोमेघाचा फोटो टिपला. इंग्रजीमध्ये या तेजोमेघास हॉर्सहेड नेब्युला असे म्हणतात. हॉर्सहेड म्हणजे अश्वमुख..म्हणजे घोड्याचे डोकं. अतिशय सुंदर असा हा फोटो आहे, तुम्ही पाहु शकता. तर याला मराठीत काही आधीचेच नाव कुणी दिले आहे का हे मी शोधले तर असे नाव आढळले नाही. मग याचे मराठीत नामकरण करण्यासाठी सर्वप्रथम शब्द आठवला तो अश्वमुख हा. अश्वमुख म्हणजे खुपच यांत्रिकी भाषांतर वाटले. आवडले नाही. पण थोड्यावेळाने अश्विन शब्द आठवला. आणि शोध संपला. आजपासुन आपण मराठी या तेजोमेघाला ‘अश्विन तमोमेघ’ म्हणुयात.
तुम्ही म्हणाल यामध्ये 'तमो' हा शब्द कासयासाठी घेतला? चला याचे कारण समजुन घेवुयात.
हॉर्स हेड नेब्युला (मराठीत आपण याला अश्विन तमोमेघ म्हणणार आहोत) हा एक डार्क नेब्युला म्हणजे मिट्ट घट्ट काळाकुट्ट पणाकडे झुकलेला असा हा अंतराळातील मेघ म्हणजे ढग आहे. तेजोमेघ आणि तमोमेघ यांमध्ये फरक आहे. तेजोमेघातुन प्रकाश निसटु शकतो तर तमोमेघातुन प्रकाश बाहेर सुटत नाही.
आणखीही काही फरक आहेतच जसे धुळ आणि वायुची घनता, हायड्रोजन वायु, व चुंबकीय क्षेत्र.
वरील फोटोचे ढोबळ मानाने दोन भाग करुयात. वरील भाग म्हणजे लालसर दिसणारा भाग, या भागात ता-यांची संख्या खालील काळसर भागापेक्षा जास्त दिसते आहे. हा लालसर रंग हायड्रोजन अणु मधील एक इलेक्ट्रॉन निसटल्यामुळे आलेला असतो. बहुधा तेजोमेघ जे सुंदर व रंगीत दिसतात ते अशाच आयोनाईज्ड हायड्रोजन अणुंमुळेच दिसतात. अर्थात हे रंग केवळ फोटो काढल्यानंतरच दिसतात. उघड्या डोळ्यांना हे दिसु शकत नाहीत. फोटोमध्ये दिसणा-या लाल भागाविषयी आपण थोडक्यात समजुन घेतले.
आता आपण तमोमेघाविषयी थोडक्यात माहिती घेऊयात. या तमोमेघाच्या जवळ खुप मोठा तारा आहे ज्याला सिग्मा ओरायनिस म्हणतात. हा सिग्मा ओरायनिस म्हणजे आपण ज्याला व्याधाने मारलेला बाण म्हणतो ना त्यातील व्याधाच्या दिशेचा तारा होय. याला इंग्रजीमध्ये अलमिंटका असे म्हणतात. या ता-याच्या चुंबकीय प्रभावाने अश्विन तमोमेघातील अतीघट्ट, अतीघन असलेल्या वायु व धुळीला विशिष्ट दिशा व प्रवाह मिळत असतो. या अतीघट्ट , अतीघन धुळीमुळेच मागील ता-यांचा प्रकाश आपणाप्रत पोहोचु शकत नाही.
ओरायन म्हणजे मृग तारकापुंजामध्ये दोन भिन्न गुणधर्मांचे अंतराळीय मेघ आहेत. पहिला म्हणजे सर्वपरिचीत ओरायन तेजोमेघ व दुसरा म्हणजे आज आपण ज्याविषयी माहिती घेत आहोत तो म्हणजे अश्विन तमोमेघ. ओरायन तेजोमेघातुन आरपार प्रकाश आपणाकडे येतो तर अश्विन तमोमेघातुन प्रकाश अजिबात इकडे येत नाही. फोटोत दिसणारा हा तमोमेघ म्हणजे कमी वस्तुमान असणा-या ता-यांना जन्म देणारी सुपीक खाण आहे. घोड्याच्या मानेच्या आसपास जे तेजस्वी ठिपके दिसत आहेत ते म्हणजे दुसरे तिसरे काही नसुन चक्क नवीन जन्म घेणारे तारे आहेत.
तर मित्रांनो आपण हे लिहिता लिहिता, वाचता वाचता दोन नवीन शब्द मराठी भाषेला दिले, अथवा नव्या अर्थाने वापर सुचवला आहे. हॉर्स हेड डार्क नेब्युलास अद्याप मराठी भाषेत नाव नव्हते ते आपण दिले. हॉर्स हेड साठी अश्विन हा शब्द आणि डार्क नेब्युला साठी तमोमेघ हा शब्द नव्याने आपण योजला आहे.
आशा आहे तुम्हाला हा लेख आवडला असेल. कृपया लाईक, शेयर करायला विसरु नका. आणि तुमचा अभिप्राय नक्की कमेंटच्या रुपात कळवा.
© हेमंत ववले, निसर्गशाळा, पुणे
Share this if you like it..
Leave a Reply