इर्शाळवाडी दुर्घटनेच्या निमित्ताने गोष्ट सह्याद्री – भाग एक

अवकाशात सुर्य ता-याचा जन्म झाला तेव्हा एक मोठा विस्फोट झाला. प्रचंड प्रमाणात धुळ आणि वायु अवकाशात दुर दुर फेकली गेली. दुर दुर फेकल्या गेलेल्या त्या धुलीकणांमध्ये आण्विक गुणधर्म असल्याने, ते एकमेकांना आकर्षित करुन सुर्याभोवती फिरु लागले. एकेक करीत अनेक अवकाशीय पिंड वक्राकार मार्गाने सुर्याभोवती पिंगा घालु लागले. अणुंमधील एकमेकांना आकर्षुण घेण्याची क्षमता वाढतच होती, ती इतकी जास्त झाली की आता अवकाशात सुर्याभोवती ग्रह निर्माण झाले. सुर्यापासुन कुणाचे अंतर किती त्यानुसार प्रत्येकाची रचना वेगवेगळी होत गेली. आपली पृथ्वी यापैकीच एक ग्रह, घनपदार्थांचा जमावडा, की मुळ निर्माण झाला सुर्य निर्माण होताना झालेल्या धुळ आणि वायुमुळे. घनपदार्थ आणि त्यातील प्रचंड आण्विक ऊर्जा यामुळे यामुळे पृथ्वीचे तापमान प्रचंड वाढलेले होते, इतके की इथे आता जसा समुद्र आहे पाण्याचा तसा समुद्र सोडा पण पाण्याचा एक थेब देखील नव्हता पण होता विशाल असा लाव्हा रसाचा समुद्र.

कल्पना करा ही धरती त्यावेळी वस्त्र ल्यायली होती अग्नीचे. दुसरं काहीच नाही. प्रचंड आगीमुळे घनपदार्थांचे विघटन होऊ लागले, त्यातील जड पदार्थ वेगळे होऊन, खोल आत आत पृथ्वीच्या गाभा-याकडे सरकु लागले तर हलके पदार्थ पृष्टभागाकडे येऊ लागले. त्यावेळी पृथ्वीभोवती आता आहे तसे वातावरण नव्हते म्हणजे ओझोनचा थर नव्हता, वायुमंडल नव्हते. त्यामुळे अवकाशीय उल्कापिंड बिनदिक्कत पृथ्वीवर येऊन आदळायचे. अशाच अशनी आणि उल्कांसोबत पाणी पृथ्वीवर आले. कित्येक करोडो वर्षे हे असे सुरुच राहिले. तापमान कमी होऊ लागले. एकवेळ अशी आली की पृथ्वीचा सर्व पृष्ठभाग पाण्यानेच वेढला गेला.  गाभ्यातील आण्विक क्रियाप्रकीयांमुळे आतील प्रचंड आग लाव्हारसाच्या रुपाने बाहेर येऊ लागली. बाहेर येऊन लाव्हा थंड झाला की त्याठिकाणी प्रचंड मोठे पर्वत आणि भुखंड बनु लागले. तेव्हा पृथ्वी आता फिरते आहे तितकी हळुवार फिरत नव्हती. आता पेक्षा दुप्पट वेगाने ती स्वतःभोवती फिरत होती. लाव्हा बाहेर येण्याचे प्रमाण इतके वाढले की पृथ्वीचे तापमान पुन्हा खुप वाढले. वातावरणातुन आम्ल म्हणजे ऍसिडचा पाऊस सुरु झाला. कार्बनडायऑक्साईड खुप वाढला. आणि मग सुरु झाले हिमयुग. म्हणजे प्रचंड थंडी. अर्थात थंडी वाजावी असे जीव अजुन जन्मास यायचे होते. गाभ्यात सुरु असलेली आण्विक क्रियाप्रक्रिया अजुनही सुरुच होती. कित्येक करोडो वर्षांनी पुन्हा लाव्हारस उफाळुन यायला सुरुवात झाली. पुन्हा तापमान वाढले, बर्फ वितळला, सगळीकडे पाणीच पाणी.

सुरुवातीची सव्वा चारशे करोड वर्षे आपल्या पृथ्वीवर हे असेच सुरु होते. नंतरच्या काळात वातावरण बनायला सुरुवात झाली. ते स्थिर व्हायला लागले. सजीवांसाठी पोषक वातावरण बनायला सुरुवात झाली.  साधारण ८० करोड वर्षांपुर्वी पहिला सजीव, एकपेशीय सजीव जन्माला आला. त्या सजीवाची उत्क्रांती होत होत, त्याचे रुपांतर महाकाय डायनासोर मध्ये होईस्तोवर जवळ जवळ साठ करोड वर्षे उलटली.

साधारण पंचवीस कोटी वर्षांपुर्वी पॄथ्वीवर एकछ्त्री अम्मल होता तो डायनासोरचा. समुद्र, जमीन आणि आकाश सगळीकडे केवळ त्यांचेच राज्य होते. त्याच काळात आधुनिक मनुष्याचे पुर्वज म्हणजे सस्तन प्राणी जमीनीखाली रहायचे म्हणुनच ते स्वतःचा बचाव करु शकले. जमीनीखाली राहण्याच्या कौशल्याने आपल्या पुर्वजांना अजुन एका खुप मोठ्या आपत्तीतुन वाचवले. ते म्हणजे महाकाय उल्का आणि लघुग्रह याम्च्याशी झालेल्या धडकेतुन आपले पुर्वज बचावले पण डायनासोर वाचु शकले नाहीत. एकाच वेळी दहा हजार अणुबॉंब चे स्फोट व्हावेत इतकी प्रचंड ऊर्जा निर्माण झाली. धुर आणि धुळीचे लोट सर्वत्र पसरले. जंगले नाहीशी झाली. कार्बनडायऑक्साईड चे प्रमाण वाढले. पुन्हा तापमान वाढले, आम्लवर्षा आणि पुन्हा हिमयुग.  

स्वतःभोवती फिरण्याचा वेग जास्त असल्याने पृथ्वीवरील सर्व घन पृष्टभाग, अगदी गाभ्यापर्यंतचा घन भाग पॄथ्वीच्या पृष्टभागावर एकाच ठिकाणी एव्हाना जमा झालेला होता, नव्हे नव्हे तो बनतानाच तसा एकसंध बनला होता. आताचे शास्त्रज्ञ त्या महाभुखंडाला पॅंजिया किंवा गोंडवन म्हणतात. आता म्हणजे साधारण वीस करोड वर्षांपुर्वी या एकाच भुभागाचे अनेक तुकडे झाले. आणि ते पृथ्वीवर चहुदिशांना वाहात गेले. हे भुभाग म्हणजे लाव्हा थंड होऊन बनलेले भुखंड आणि पर्वत होय. पृथ्वीच्या जन्मापासुनच त्यांची बनण्याची क्रिया सुरु होती. त्यांना बनण्यासाठी कित्येक करोडो वर्षे लागली आहेत.

त्या अनेक भुखंडांपैकीच एक आहे आपला भारतीय उपखंड. भारतीय उपखंड मुळचा आशियाचा भाग नाहिये. खरतर आशिया खंड देखील पुर्वी त्याच एकाच मोठ्या भुखंडाचा म्हणजे पॅंजियाचाच भाग होता.

म्हणजेच काय तर आपला भारत आणी भारतातील प्रत्येक पर्वत (हिमालय अपवाद) तितकाच जुना आहे जितके पृथ्वीचे वय आहे. येथील मातीचा कण न कण असा का झाला याचे कारण या मातीने इतक्या करोडो वर्षाम्च्या अनुभवातुन हे शिकले आहे की या सुर्यमंडलात, या अवकाशात तग धरायची असेल तर त्यासाठी कसे स्वतःमध्ये बदल केले पाहिजेत.

अणुरेणुंनी करोड वर्षांच्या अनुभवातुन आत्मसात केलेले हे ज्ञान आहे आणि यामुळेच आज आपणास जी वसुंधरा मिळाली आहे ती स्थिर आणि सजीवांसाठी अनुकूल बनली आहे.

सह्याद्रीचे वय किती असावे? काही लोक अस मानतात की पॅंजिया पासुन वेगळा झाला तेव्हापासुन वय मोजावे. तर काही जण म्हणतात की महाभुखंड निर्मिती झाली तेव्हा पासुनचा कालावधी हे वय मानावे. पण याही पुढे शाश्वत तत्वांच्या आधारे विचार केल्यास आपणास उमजुन येईल की ही पृथ्वी जी आज जड भासते, जित्यात जडत्व आहे, सजीव निर्जीव सृष्टीचा आधार आहे ती अनादी आहे, अनंत आहे. तिचे रुप केवळ बदलत गेले आहे. या वसुंधरेला निर्जीव , संवेदनाहीन मानणारे देखील आहेत. पण मित्रांनो विचार करा, मनुष्य म्हणुन स्वतःस बुध्दीमान समजणा-या आपल्या सारख्या प्राण्याची निर्मिती कशातुन झाली? कशाच्या विकासातुन झाली? एकेकाळी तप्त गोळा असणा-या या धरेने स्वतःमध्ये बदल केले उत्क्रांतीवादाच्या तत्वाप्रमाणे आपण जर पृथ्वीकडे पाहिले, एक स्वतंत्र अस्तित्व म्हणुन पाहिले तर या धरेची देखील उत्क्रांती झालेली आहेच. एक उत्क्रांत आणि प्रगल्भ सजीव , महाकाय सजीव आहे आपली ही धरणी माता.

कळावे
हेमंत सिताराम ववले,
निसर्गशाळा, पुणे

Facebook Comments

Share this if you like it..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *