जुलै महिन्यामध्ये नदी, नाले, ओढे यांना अक्षरशः पुर आणणारा असा झोडपुन काढणारा पाऊस आपण अनुभवला. नदी नाले ओढेच काय घेऊन बसला, आपल्या रस्त्यांवर देखील पुरसदृश्य स्थिती निर्माण झाली होती. त्यातच आपले रस्ते व रस्त्यावरील खड्डे यामुळे तर सर्वांनाच हैरान करुन टाकले. मुंबई मधील रस्त्यांवरील महापुर, वाहतुकीच्या समस्या, रेल्वेचे अपघात, दरडी कोसळणे, बांध फुटणे हे सर्व याच महिन्यात होत असते. यावर्षी अतिशय समाधानकारक असा आषाढातील पाऊस झालेला आहे. आषाढातील या पावसाचे हेच तर वैशिष्ट्ये आहे. उन्हाळ्यामध्ये तप्त झालेल्या धरेला तृप्त करणारा, पावसाळ्याच्या सुरुवातीचा पाऊस पेरण्यांसाठी खुप गरजेचा असतो. एकदा पेरण्या झाल्या, भाताची रोपे वीतभार वाढली की मग भातलावणी सुरु होते. या भातलावणी साठी मात्र हलका पाऊस काही कामाचा नसतो. मुसळधार पाऊस पडला नाही तर भात-खाचरे पाण्याने तुडूंब भरणार नाहीत. शहराच्या पश्चिमेला असलेल्या मावळपट्ट्यात, आषाढामध्ये भातलावण्या पुर्ण होतात. श्रावण सुरु होण्यापुर्वीच भात लावण्या झालेल्या असतात.   शेतकरी एव्हाना भातलावणी करुन, पेरण्या करुन मोकळा झालेला असतो. अत्यंत धामधुमीचा आषाढ शेतक-यंसाठी कष्ट करण्याचा असतो. आषाढ संपला की मग मात्र सुरु होतो आनंदोत्सव. हा आनंदोत्सव नुसता शेतक-यांसाठीच नसतो, तर तो असतो अवघ्या सृष्टीसाठी. वादळ-वारे एव्हाना शांत झालेले असतात. मुसळधार, झोडपुन काढणारा पावसाची जागा रिमझिम श्रावण सरींनी घेतलेली असते. उन पावसाचा लंपडाव सुरु होतो. त्यातच सप्तरंगी इंद्रधनुष्य, कुठेना कुठे क्षितिजावर मनमोहक नजारा तयार करीत असतो. आषाढातील जीवघेण्या पावसाने सर्वांनाच अक्षरशः नकोसे झालेले असते. मनुष्य जेव्हा शेतीच्या कामात व्यस्त असतो आषाढामध्ये तेव्हा, निसर्गातील इतर प्राणी, पक्षी देखील या जीवघेण्या पावसापासुन स्वतःचा जीव वाचवण्यासाठी कष्ट उपसत असतात. सर्वांनाच आतुरता असते श्रावणाच्या शुभागमनाची. इतके दिवस पावसाने कहर केलेला असल्याने निसर्गाकडे, निसर्गाच्या सौंदर्याकडे फारसे कुणाचे लक्ष जात नाही. पण श्रावणात मात्र उसंत मिळालेल्या माणसाला निसर्गामध्ये झालेल्या अदभुत अशा बदलांचे दर्शन होते. श्रावणातील निसर्गाने भारतातील प्रत्येक भाषेतील साहित्यिकांना मोहीनी घातलेली आपणास दिसते. मराठी मध्ये तर श्रावण आणि कविता, सुमधुर गीते असे समीकरणच झालेले आहे. चला तर मग जाऊयात एका अदभुत अशा श्रावण सफरीवर. विविध कवि, कवयित्रींनी रचलेल्या अजरामर अशा श्रावण-कविता, श्रावण-गीतांनी मराठी मनावर कायमची छाप उमटवलेली आपणास दिसते. मंगेश पाडगावकर कवि म्हणुन प्रसिध्द तर आहेतच पण या श्रावणाने त्यांच्यातील हळवा तत्वज्ञानी, सत्यान्वेषी देखील आपणास दाखवला. श्रावणात त्यांना गवसलेल्या अंतर्यामीच्या सुराचा किनारा मात्र त्यांना सापडला नाही. लता मंगेशकरांच्या सुमधुर आवाजातील हे गीत श्रावणात होणा-या अंतर्यामीच्या मृदुल हिंदोळ्यांचे रुप आपणास शब्दात आणि सुरांत दाखवतात. श्रावणात घन निळा बरसला https://youtu.be/HlqUzghyic8?t=16 श्रावणाचे नाव घ्यावे आणि बालकवींच्या ‘श्रावणमानसी हर्ष मानसी’ य कवितेच्या ओळी आठवणार नाहीत असा मराठी माणुस शोधुन सापडणार नाही. श्रावणमासी हर्ष मानसी https://youtu.be/cP46RcOa7zo कवी कुसुमाग्रजांना श्रावण हासत नाचत येताना दिसतो. गानसम्राज्ञी पद्मजा यांच्या आवाजातील हे श्रावणगीत, कुसुमाग्रजांच्या श्रावण विश्वाचे दर्शन घडाविणारे आहे. हासरा नाचरा जरासा लाजरा, सुंदर साजिरा श्रावण आला https://youtu.be/-AtJvXQRoaM श्रावणात निसर्गाने जणु एक आगळेच, विलोभणीय रुप घेतलेले असते. निसर्गाचे हे रुप कवयित्री इंदिरा संत यांना, एखाद्या मनस्वी चित्रकाराने चितारलेले निसर्गचित्रच भासते. या निसर्गचित्रामध्ये स्पदने आहेत. जिवंतपणा आहे. चेतना आहे. इंदिरा संत यांची कविता – श्रावणा कुणाचे मनस्वी हे क्षण? घातले, झाडले        चाफ्याचे शिंपणबांधले, तोडले         इंद्राचे तोरण;झाकला, काढला     दरवाजा घराचाविझला, तेवला        लामण सूर्याचा;  उन्हाचे पाटव           नेसले, टाकलेवाऱ्याचे पैंजण         घातले, फेकले;घातले, धुतले           डोळ्यात काजळलावले, पुसले           केवडाअत्तर;  बांधले, सोडले         हिंदोळे हर्षाचेहासले रुसले           मयूर मनाचे;श्रावणा, कुणाचे       मनस्वी हे क्षणनिसर्गचित्रात           पावले स्पंदन?  – इंदिरा संत (रंगबावरी) संगीतकार कौशल इनामदार यांचे देखील श्रावण आणि पावसावर खुप प्रेम आहे. त्यांच्या अनेक रचनांपैकी श्रावणाच्या आणि पावसाच्या रचनांमध्ये त्यांनी स्वतःचा प्राण ओतल्याचे आपणास दिसुन येते. इनामदार यांनी शांता शेळके यांच्या श्रावणाच्या या कवितेवर अतिशय मधुर आणि हृद्याला स्पर्श करणारी रचना केली आहे. शांता शेळके यांच्या विषयी ते पुढील शब्दांत लिहितात. “शांताबई शेळकेंच्या गीतलेखनात एक सिनेमॅटिक क्वॉलिटी आहे. एका गीतातून आपल्या डोळ्यांसमोर ते पात्र, तो प्रसंग, ते वातावरण सगळं उभं राहतं. त्यांच्या चित्रपटबाह्य गीतांतूनही आपल्याला हा गुण दिसतो. मग ते ‘तोच चंद्रमा नभात’ असो किंवा ‘जिवलगा राहिले दूर घर माझे’ असो. नुसत्या चित्रमयतेच्या पलीकडचा हा गुण आहे.” , कौशल इनामदार शांताबाईंनी लिहिलेली एक कविता आहे – रिमझिम बरसत श्रावण आलासाजण नाही आला https://youtu.be/nrs5XjdJ-cc श्रावण जसा निसर्गाच्या अनुपम रुपासाठी ओळखला जातो तसाच तो प्रेमी युगलांच्या प्रेम-भावनेच्या अभिव्यक्ति साठी देखील ओळखला जातो. सुमन कल्याणपुरकर यांचे हे भाव-गीत तुम्हाला मंत्रमुग्ध केल्यावाचुन सोडणार नाही. शांता शेळके यांची रचना तुम्हाला नक्कीच आवडेल. मला हे गीत विशेष आवडते कारण यातील  भाव गायिकेने अक्षरशः प्रत्यक्षात आणला आहे. गे गीत ऐकताना आपण शांत होऊन जातो. डोळे बंद करावे आणि पुढील हे गीत ऐकावे. झिम झिम झरती श्रावणधारा https://youtu.be/mUUQgTta_MQ शंकर महादेवन यांच्या आवाजातील हे श्रावणगीत तुम्ही कदाचित ऐकले नसेल. आधुनिक संगीत शैलीमध्ये श्रावणाचे तेच मनमोहक रुप आपणास या सुर संगीतामध्ये दिसते. ओल्या सांजवेळी https://youtu.be/Z7oZyPMa3oE वेगवेगळ्या सिनेमांमध्ये देखील श्रावण व श्रावणामध्ये फुललेल्या हळुवार भाव-भावनांचे चित्रण गीतांच्या माध्यमातुन होते. लोकशाहिर, विनोदी सिनेकलाकार दिवंगत दादा कोंडकेंच्या कल्पकतेलादेखील श्रावणाने भुरळ घातली. त्यांच्या वाजवु का या सुपरडुपर हिट चित्रपटातील हे गाणे देखील छान आहे. https://youtu.be/_nwFx3yGN4Y श्रावण आला ग वनी (सिनेमा – व-हाडी आणि वाजंत्री) हे गीत तुम्हाला जुन्या काळात घेऊन जाईल. https://youtu.be/ms3Dss1Gyqk श्रावण म्हणजे जसा निसर्गाचा उत्सव तसाच भारतीय संस्कृतीचा देखील. श्रावणापासुन पुढे अनेक सण-वारांची जणु श्रृंखलाच सुरु होते. आपले हे सारे सण आपणास निसर्गाशी जोडण्यासाठीच आपल्या पुर्वजांनी योजलेले आहेत. नागपंचमी मध्ये नागाची पुजा करण्याची पध्दत काही नवीन नाही आणि जुनी जरी असली तरी विनाकारण नाहीये. कृषि-संस्कृतीमध्ये नाग-सर्प यांना खुप महत्वाचे स्थान आहे. विविध सण-वारांना निसर्गातील विविध घटकांशी मनुष्य जोडला जाईल व मनुष्य हा निसर्गाचा भाग आहे हे विसरणार नाही याची काळजी घेतली आहे. नागपंचमी, मंगळागौर हे सगळे उत्सव स्त्रियांच्या बहरण्यासाठीचेच आहेत. १९४८ मध्ये प्रदर्शित झालेल्या जिवाचा सखा या चित्रपटातील नागपंचमीचे हे गाणे देखील तुम्हाला आवडेल. https://youtu.be/U9zep85HlqQ पुर्वीच्या काळी नव्या नव-या मंगळागौरीची आतुरतेने वाट पहायच्या. आपल्या नव-याच्या दिर्घायुष्यासाठी यात पुजा धरण्याची प्रथा होती पुर्वी. ही पूजा करायची म्हणजे नव्या नवरी सगळ्या नटून थटून येतात. काही हौशी मुली तर नऊवार साडी आणि त्याला साजेसे सगळे दागिने घालतात.. थाटच असतो छान! शंकराची पिंड करून त्याची पूजा केली जाते. पूजा होईपर्यंत उपास केला जातो. नंतर पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून सुग्रास जेवण जेवतात. दुपारच्या वेळी थोडंसं झोपून आपली मंगळागौरीची पूजा छान फुलांनी सजवली जाते आणि वाट पाहातात ती रात्रीच्या जागरणाची. मंगळागौर म्हणजे रात्रीच्या जागरणाचीच ओढ असते. रात्रभर खेळ खेळून, गाणी म्हणून ही मंगळागौर जागवली जाते. ‘पिंगा ग पोरी पिंगा’ हे गाणे तुम्ही कदाचित बाजीराव मस्तानी या चित्रपटात पाहिले असेल. पण हे आणि अशी अनेक गाणी गात-नाचत खेळत नवविवाहिता रात्र जागवुन काढायच्या. नव्यानेच सासुरवाशीन झालेल्या त्या सुकुमार मुलीला तिचे
एक दोन दिवसांपासुन समाधानकारक पाऊस सुरु झालेला दिसतोय पुणे परिसरामध्ये. आपल्या कॅम्पसाईट परिसरामध्ये तर या आधीच मस्त पाऊस सुरु झालाय. ओढे, नद्या, नाले खळखळ वाहु लागले आहेत. आणि असेच मोहीत करणारे, हिरवे हिरवेगार गालिचे पुणे परिसरामध्ये लवकरच दिसतील. आपल्या सर्वांनाच ज्या पावसाची प्रतिक्षा होती तो झालाच सुरु एकदाचा. पण पाऊस कधी सुरु होईल, होईल की नाही होईल यावर्षी पाऊस, पुरेसा पाऊस पडेल की नाही अशा अनेक चिंतांनी आपण सारेच ग्रासलेलो होतो. इतके की सोशल मीडीयावर पाऊसाचे तुलना वाट पहायला लावणा-या प्रियसी सोबत केल्याचे मेमेज अगदी भरभरुन व्हायरल झाले. पाऊस कुणाला नकोय बरे? सर्वांनाच पाऊस हवाय. पण तो पाऊस योग्य पध्दतीने पडण्यासाठी आपणाकडे जसे पर्यावरण हवे, जसे पुर्वी होते तसे आता राहिले नाही. काही मोजकेच पर्यावरण प्रेमी लोक नाना प्रकारे पर्यावरण संरक्षण व संवर्धनासाठी प्रयत्न करताहेत. अशा लोकांसाठी पाऊस म्हणजे संजीवनीच आहे. व हौशे-नवशे-गवशे देखील पावसाची वाट पाहतातच की. एकदाका पाऊस सुरु झाला की मग यांना घाटामाथ्यावर म्हणजे मुळशी, मावळ, वेल्हा, भोर अशा मावळ भागात जाऊन मद्यधुंद व्हायचे असते. धांगडधिंगाणा करायचा असतो. तर काहींना नुकत्याच हिरव्यागार झालेल्या एखाद्या डोंगरासोबत सेल्फी काढायचा असतो. असणारच असे लोक देखील. पण यांना पावसाच्या येण्याशी किंवा न येण्याशी फार काही देणे घेणे नसते. असो तर ज्या लोकांना मुळातच निसर्गाची आवड आहे, निसर्गात रमायला ज्यांना आवडते, जे निसर्गात आपोआपच रममाण होतात, मंत्रमुग्ध होतात अशा लोकांना पाऊस कधी सुरु होईल, सुरु झाला तर खुप जास्त होईल की, मध्यम होईल की खुप कमी पाऊस होईल की दुष्काळच पडेल अशा प्रश्नांची उत्तरे आधीच मिळाली तर? तुम्ही म्हणाल की यासाठी हवामान खाते आहे की, त्यांचा अंदाज वाचला की कळेल आपणास सर्व! पण हवामान खात्याच्या अंदाजावर विसंबुन राहणे म्हणजे पुर्वतयारी साठी वेळ न मिळण्यासारखे आहे. हवामान खात्यास देखील पावसाचे पुर्वानुमान अचुक सांगणे अद्याप जमले नाही. मग कसे काय कळणार बरे पावसाचा अंदाज? यासाठी  या व्हिडीयोमध्ये, मारुती चितमपल्ली यांचे निसर्गाचे हवामान खाते अवश्य पहा. अंदाजे १५ मिनिटांचा व्हिडीयो आहे, त्यामुळे एकाच बैठकीत पाहता येईल अशी वेळ निवडुन आठवणीने पहा ऐका मारुती चितमपल्ली यांना!
आम्ही अगदी निशब्द बसुन राहिलो. कुणाचा ही कसलाही आवाज येईनासा झाला होता. अगदीच कुणी थोड उशिरा आल असेल तर त्यांच्या पायाखाली येणा-या, वाळलेल्या पानांचा तेवढा कर-कर असा आवाज येत होता. बसलेल्या लोकांना न बोलण्याच्या आणि टॉर्च न लावण्याच्या सुचना जरी दिल्या होत्या तरी त्या सुचनांपेक्षा समोरचे अलौकिक असे दृश्य पाहुनच सगळेच निशब्द झाले होते. अगदी कुणी बोलले तरी आजुबाजुचे त्यांना शांत करीत होते. कुणी टॉर्च लावलाच तर लागलीच बाकीचे लोक “लाईट बंद करा, टॉर्च बंद करा” अशा सुचना, कुजबुज आवाजात देत होते. मी जरी या सहलीचा आयोजक असलो तरी, सहभागी झालेले सर्वच जण, प्रत्येक जणच निसर्गमित्र होऊन समोरील दॄश्यास व निसर्गास कसलीच बाधा होणार नाही याची काळजी घेत समोर सुरु असलेल्या अलौकिक अशा प्रकाशपर्वाचा, लख लख चंदेरी सोहळ्याचा आनंद घेत शांत झाला होता. माझ्यासाठी हे दृश्य काही नवीन नाही, तरी मी देखील नुसताच बाह्य शांततेचा अनुभव घेत नव्हतो तर आंतरिक शांततेचा, परिपक्वतेचा व सामंजस्याचा अनुभव घेत होतो. जीवनरस त्या झाडाच्या प्रत्येक फांदी, प्रत्येक पानांतुन ओसंडुन वाहुन प्रकाशाच्या रुपाने बाहेर येतोय असे हे दृश्य एखाद्या आस्तिकास दैवी वाटावे इतके नाट्यमय होते. आणि निव्वळ तर्कबुध्दीला प्रमाण मानणा-यांसाठी हा सोहळा म्हणजे निसर्गा अदभुत अशी अभिव्यक्तिच आहे. कधी कधी मी आमच्याकडे येणा-या पाहुण्यांसाठी, (वेळ उपलब्ध असेल तर) एक कार्यक्रम घेतो. यामध्ये प्रत्येक जण स्वतः एक वृक्ष आहे असा आविर्भाव आणुन, वृक्षासम भुगर्भातुन जीवनरस घेऊन,  झाडाची मुळे, खोड, शाखा-उपशाखा आणि प्रत्येक पानामध्ये तो जीवनरस उर्ध्व दिशेने प्रवाहीत करीत आहोत असा अनुभव घेतो. सोबतच सुर्याकडुन मिळणारी प्रकाश किरणे शोषुन घेऊण, ती अधः दिशेने प्रवाहीत करण्याचा अनुभव देखील घ्यायचा असतो. वा-याच्या झोक्यांसोबत झाडाचे डुलणे, पानांचे हलणे या सगळ्या गोष्टींचा अनुभव प्रत्येक जण स्वःत घेतो. मी खुप वेळा असे केले आहे. आणि असे केल्याने आपण क्षणभर हा होईना, एखाद्या योग्यासारख्या वर्षानुवर्षे उभे असणा-या त्या झाडाचे जीवन जगुन घेतो. पण आता आम्ही समोर जे काही पाहत होतो त्यामुळे मला आमच्या त्या  “चला वृक्ष होऊया” या ॲक्टीव्हिटीची आठवण झाली. नव्हे नव्हे निसर्गातील चैतन्याचा उगम, प्रवाह, त्याची उर्ध्वगामी, अधोगामी दिशा, असे सर्वकाही आम्ही पाहत होतो. अवतार सिनेमामध्ये ज्याप्रमाणे ते एकच झाड सर्व चराचराशी जोडले गेल्याचे व जीवनरस सर्वच दिशांनी प्रवाहीत होताना दाखवला आहे अगदी तसेच हे झाड आम्ही पाहत होतो. याच झाडावर, अवती भोवती असंख्य, कदाचित लाखोंच्या संख्येने काजवे घिरट्या घालत होते. तितक्याच मोठ्या संख्येने काजवे झाडाच्या मिळेल खोड, शाखा-उपशाखा, फांद्या, पाने व फुलो-यावर बसुन, त्य झाडास लख्ख प्रकाशित करीत होते. काजव्यांविषयी बरीच तांत्रिक, जैव शास्त्रीय माहिती मी वाचली, लिहिली आहे या पुर्वी. सोहळा पाहत असताना मनामध्ये उठणा-या भावनिक लहरींचा आनंद, नित्य नुतन असा आहे. आंनदाचे भरते येणे म्हणजे काय तर हे हा निसर्गसोहळा पाहताना समजते. आणि हा एकदम निर्भेळ असा आनंद आहे. यात कसलाही स्वार्थ नाही. यात कुणाकडुन ही कसलीही अपेक्षा नाही. यात कसलीही चिंता नाही. यात आप-पर भाव नाही. यात आहे निव्वळ, केवळ आनंदानुभव. आणि या अनुभवातील एक गम्मत अशी देखील आहे की असा अनुभव जर तुम्ही घेतला तर तुम्ही निसर्गाच्या सामंजस्यातील एक घटक होऊन जाता. मग निसर्ग आपोआपच तुमच्या कडुन निसर्गाची आणि तुमची स्वःतची काळजी करवुन घेतो. इवल्याशा, नाजुक त्या काजव्यांचे आयुष्य ते असे किती? एखाद दोन आठवडे किंवा जास्तीत जास्त तीन आठवडे. पण याच तीन आठवड्यात हे काजवे काळोखाला देखील विलोभनीय करतात. हो काजवे काळोखास आणखी जास्त प्रेक्षणीय करतात. काजवे अगदी निर्बंध पणे संचार करीत होते. काजव्यांचे ते झेप घेणे, प्रकाशित होणे निर्बंध जरी असले तरी ते निसर्गातील एकुणच सामंजस्याला आणखी जास्त सुशोभित करीत होते. इथे कसलेही नियम नव्हते. उन्मुक्तपणे यथाशक्ति निसर्गाच्या त्या चैतन्याला अभिव्यक्त करीत हे काजवे, आमच्या समोरच्या त्या झाडावर प्रियराधन तर करीत नसावे ना? मधमाशीच्या पोळ्यावर ज्या प्रमाणे मधमाश्या गच्च गर्दी करतात अगदी त्याचप्रमाणे समप्रमाणात संपुर्ण झाडावर काजव्यांचा हा मनमोहक सोहळा सुरु होता.  त्या निर्बंधात देखील एक लय होती. एकतानता होती. आम्ही ज्या ठिकाणी बसलो होतो त्याच्या मागेच एक खोर आहे. या या खो-यामध्ये अनेक उंचच उंच झाडांवर अशाच प्रकारे काजव्यांचे चमचम करणे सुरु होते. आमच्या समोरील झाडावरील हा प्रियराधन सोहळा आम्ही खुप जवळुन पाहत होतो. एकेक काजवा आम्हाला दिसत होता (म्हणजे त्याचे चमकणे दिसत होते). पण दुरवर असणा-या या गर्द झाडी मध्ये सुरु असलेले काजव्यांचे चमकणे एक आणखीच जास्त भन्नाट देखावा तयार करीत होते. काजव्यांचे चमकणे एका झाडापासुन सुरु होऊन, लयबध्द पध्दतीने, दुस-या, तिस-या, चौथ्या असे करीत संपुर्ण जंगलभर पसरत जायचे. पुढचे झाड चमकले की मागचे चमकणे कमी व्हायचे.  या चमकण्याला एक रिदम, एक लय होती.या लयीतुन देखील काजव्यासारख्या इवल्याशा किटकांमध्ये संदेशवहन, संवाद किती सुगम व परिणामकारक असेल याचा अंदाज येत होता. आमच्या या सहलीची आणखी एक गम्मत होती बर का! आम्ही जमिनीवर झाडावर लक्ष लक्ष चंदेरी, चम चम, लुक लुक करणारे काजवे पहात होतोच आणि आमच्या वर, त्या अंतहिन आकाशामध्ये देखील अब्जावधी तार-तारकापुंज चमकत होते, प्रकाशित होत होते. आग्नेयेला वृश्चिकाने अर्धे आकाश व्यापले होते आणि वायव्येला सप्तर्षी अस्ता कडे जात होते. या दोहोंच्या मध्ये असंख्य तारे, छोटे-मोठे चमचम करीत होते. वृश्चिकाच्या थोडेसे डावीकडे गुरु ग्रह देखील दिमाखात चमकत होता. त्याच्याही आणखी डावीकडे, क्षितिजाजवळ शनि उगवला होता. रात्रीचे १ वाजुन गेले होते तेव्हा आणि त्यातच ही अमावस्येच्या जवळचे रात्र. आणि आम्ही शनि व गुरु यांच्या मध्ये, धनु तारकापुंजाच्या पल्याड, खुप खोल अंतरिक्षामध्ये आपल्या आकाशगंगेला देखील पहात होतो. कधी जमिनीवर, झाडावर चमचम करणारे काजवे तर कधी आकाशामध्ये चम चम करणारे तारे पहात होतो. एखाद्या कविमनाच्या, संवेदनशील माणसाला आकाशातील तारे जमिनीवर उतरलेले दिसतील व जमिनीवरील काजवे आकाशात जाऊन रोहीत झाल्यासारखे वाटले तर त्यात नवल ते कसले. खाली तारे, वर तारे आणि आमच्या अंतर्मनात देखील तारे. लख लख चंदेरी तारे! भानावर यावे लागते व इतरांनी देखील आणावे लागते. आमच्या बसेस आमच्या प्रतिक्षेत होत्या. मध्यरात्री कॅंपसाईटपर्यंत प्रवास देखील करायचा होता. त्यामुळे मला संर्वांना या तंद्रीतुन बाहेर काढावे लागले. सर्वांना गाडीमध्ये बसवुन आम्ही मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचलो. जाणीवपुर्वक या लेखामध्ये एक ही फोटो टाकलेला नाही. हेतु असा आहे, शब्दांतुन केलेले काजव्यांचे वर्णन वाचुन तुम्ही काजवे प्रत्यक्ष पाहत आहात असेच तुम्हाला वाटावे, हा यामागचा हेतु आहे.  तुम्हाला या वृक्षाचे व त्यावरील काजव्यांचे फोटो पहायचे असतील फेसबुक वरील माझ्या अकाउंटला तुम्हाला अवश्य पाहता येईल. https://www.facebook.com/hemant.vavale https://www.instagram.com/hemant_vavale/ हेमंत सिताराम ववले निसर्गशाळा, पुणे
झाडे, भिंती, दरवाजे यांना सहजगत्या चिकटु शकतो असा हा सुरुवातीस कालीकत मध्ये आढलेला बेडुक आपल्या भागात देखील आहे.
हे अगदी मोजकेच फोटो आहेत. मुळशी ताम्हिणी, वेल्हे मावळ पट्टा या भागात आत्तापर्यंत १९ वेगवेगळ्या प्रजातींविषयी संशोधन केले गेले आहे. आणि या १९ मधील ११ प्रजाती सह्याद्रीतील प्रदेशनिष्ट अशा आहेत. निसर्गाच्या अन्नसाखळीतील अत्यंत महत्वाच्या या घटकाकडे खरेतर तर आपण कुतुहलाने कधीच पाहत नाही. याला पाहुन बरेच जण किळस करतात.  खरेतर बेडुक सर्प यांच्या इतके स्वच्छ प्राणी जगात दुसरे कोणतेही नसतात. यांना त्यांच्या अंगावर धुळीचा एक ही कण आवडत नाही. आपल्याकडील बेडकांच्या विश्वात संशोधनासाठी खुप वाव आहे. बेडकांविषयी जनजागरण देखील खुप महत्वाचे आहे. यांचे संवर्धन होणे तितकेच महत्वाचे आहे.
Gopal in Sahyadri
माझ्या सह्याद्रीच्या भटकंतीमध्ये अनेकविध अनुभव घेण्याचे भाग्य लाभले. सह्याद्रीची प्राचीनता आणि जैवविविधता सांप्रत अधिक चर्चिली जाते. सोबतच सह्याद्रीतील शिवाजी राजांचे अभेद्य किल्ले, द-या, डोंगर, विविध प्राचीन आणि आधुनिक घाट सर्वांनाच भुरळ पाडत असतात. सह्याद्रीने चालुक्य, यादव, माऊली, तुकाराम महाराज, शिवाजी महाराज, या सर्वांनाच मोहीत केलेले दिसते. “वृक्ष वल्ली आम्हा सोयरी वनचरे पक्षीही सुस्वरे आळविती” म्हणत एकांताचा वास निसर्गाच्या सानिध्यात घेताना “आपुलाची वाद आपणासी” अशी स्वःतच्या अंतर्मनास साद घालणारे तुकोब्बा राय असो किंवा सह्याद्रीच्या कड्याकपा-यांतुन वाहणा-या जलप्रपातांच्या घळयांतुन साधना करणारे समर्थ रामदास असोत, किंबहुना सगळ्याच संत महंतांस या सह्याद्रीने, या निसर्गाने आकर्षित केलेले आपणास दिसते आहे. गुणसंपन्न सह्याद्री सह्याद्रीचे शौर्य अभेद्य किल्ल्यांच्या रुपात आजही विद्यमान आहे. प्रत्येक किल्ला, त्याच्या अवतीभवतीचे गावे, गावागावातील माणसे, लढवय्ये, मावळे, हवालदार, भालदार, धारकरी, हारकरी, किल्यावरच्या बाजारपेठा. पायथ्याची गावे, गावागावातील विविध इतिहास, कथा, दंतकथा काही ज्ञात तर काही अज्ञात. आपणास एकच हिरकणी माहीत आहे. पण अशा अनेक हिरकण्या ह्या सह्याद्रीने पाहील्या असतील. अनेक बहादुर मर्द मावळे गावागावात, वस्त्यावस्त्यांमध्ये असतील. सदोदीत उन वारा पाऊस यांचा मारा अंगावर झेलत सह्याद्री एखाद्या तपस्व्याप्रमाणे अढळपणे उभा आहे. तो अविचल आहे. तो निर्विकार आहे. कसल्याही बाह्य व्यवधानांचा परीणाम त्याच्या तपश्चर्येवर होत नाही.  म्हणुनच की काय सह्याद्रीची विरक्ती त्याच्या विविध  बौध्द लेण्यांतुन कोरली गेली आहे. असंख्य प्राणीमात्रांस अभय देणा-या सह्याद्रीची एकात्मता त्याच्या अंगाखांद्यावर वाढलेल्या जैवविविधतेमध्ये आहे. सह्याद्रीचा रुद्रावतार त्याच्या काळ्याकभिन्न कातळकड्यांमध्ये आहे. सह्याद्रीचे मातृत्व त्याच्या कड्या कपा-यांतुन उगम घेणा-या शेकडो नद्यांमध्ये आहे, ज्या पुढे जाऊन फक्त जलवाहीन्या न राहता जीवनवाहीन्या बनतात. किमान हजारेक नद्यांचा उगम सह्य रांगामध्ये होतो. काही पुर्व वाहीन्या तर काही पश्चिम वाहीन्या आहेत. शहरांना पिण्यासाठी पाणी, पाणी साठे, जलविद्युत प्रकल्प, शेतीसाठी धरणे, बंधारे, कालवे हे सर्व सह्याद्रीच्याच जीवावर आहे. सह्याद्रीचे पितृत्व त्याच्या अंगाखांद्यावर हजारो लाखो वर्षे आनंदाने खेळणा-या बागडणा-या असंख्य प्राणीमात्रांच्या पालनपोषणामध्ये आहे. मागे एका लेखामध्ये उल्लेख केल्याप्रमाणे सह्याद्रीमध्ये आढळणा-या एका बेडकाची जात साडे आठशे लाख वर्षापुर्वीची मानली जाते. व ही जात फक्त सह्याद्रीमध्येच आहे. आणि हा पुरातन काळ म्हणजे या पृथ्वीतलावर मानव नावाच्या प्राण्याची उत्पत्ती होण्याआधीचा काळ आहे. संशोधकांचा कयास जर प्रमाण मानला तर, आपणास माहीत असलेल्या या ज्ञात जीवास सह्याद्रीने कित्येक लाखो वर्षे सांभाळले आहे हे स्पष्ट दिसते. प्राचीन भारतीय संस्कृतीचा आधार सह्याद्री ह्यासोबतच सह्याद्रीच्या कुशीत भारतीय संस्कृतीची छाप अगदी डोंगर द-यात असणा-या वाड्या-पाड्यावर देखील पहावयास मिळते. आपल्याकडे एक म्हण आहे, की भाषा दर पाच मैलांवर बदलते. भाषा बदल म्हणजे सांस्कृतिक वेगवेगळेपण हे नक्कीच. असे हे वेगळेपण आपणास बारा मावळांत पहावयास मिळते. ही बारा ही मावळे सह्याद्रीच्या कुशीतच आहेत. हे वेगळेपण विशिष्ट प्रसंगी पहावयास मिळते. एक उदाहरण सांगतो इथे. आमचे कडे एखाद्या व्यक्तिच्या और्ध्वदैहीक आचारांमध्ये एका दगडास( खडा ) विशेष स्थान आहे. याला जीवखडा असे म्हणतात. आता जीवखडा नावाची संकल्पना बाराच्या बारा मावळांत म्हणजे महाराष्ट्रातील सह्याद्री मध्ये वसलेल्या डोंगरद-यात राहणा-या लोकांत आहे. पण त्यात थोडे थोडे भेद आहेत. जसे काही ठिकाणी हा खडा मरणोपरांत दहा दिवस घराच्या बाहेर टांगुन ठेवतात तर काही ठिकाणी तेरा दिवस. काही ठिकाणी हा खडा घराच्या आढ्याला आतुन टांगतात तर काही ठिकाणी हा खडा भिंतीला असेलेल्या खुंटीला टांगतात. तर सांगायचा मुद्दा असा की वेगळेपण असले तरी जीवखडा संकल्पना मात्र सगळीकडे दिसते. कुणी शिकवले असेल बरे ह्या मावळ भागातल्या म्हणजेच डोंगरद-यात वाड्यावस्त्यांमध्ये लोकांस हे कर्मकांड? हे कर्मकांड योग्य की अयोग्य हा वेगळा विषय आहे. पण एकसुत्रता सर्वत्र दिसुन येते. नुसतीच सह्याद्रीमध्येच आहे असे नाही तर संपुर्ण भारतात ही सांस्कृतिक एकसुत्रता दिसते आपणास. विकृती, प्रकृती आणि संस्कृती विकृती, प्रकृती आणि संस्कृती ह्या तीनही संकल्पना तशा एकाच मुल तत्वावर आधारीत आहेत. व ते मुल तत्व म्हणजे निसर्गनियम होय. वेगवेगळ्या संदर्भात ह्या संकल्पनांची उकल करता येईल. दोन तीन वर्षापुर्वी आमच्या घरच्या झाडाचे आंबे उतरवायचे काम सुरु होते. मी झाडावर चढलो होतो व टिपुन एकेक आंबा काढत होतो. झाडाच्या एका फांदीला आता शंभरेक आंबे शिल्लक होते. इतक्यात आई म्हणाली आता बास झाले. राहीलेले आंबे झाडाला तसेच राहुदे. मी का असे न विचारताच झाडावरुन खाली उतरलो. व आंबे पिकवण्याची आढी लावुन झाल्यावर आईला विचारले झाडाला आंबे ठेवायला का सांगितलेस तु मला? त्यावर आई म्हणाली की आपण सगळेच्या सगळे आंबे काढायचे नसतात. झाडावर येणा-या पक्षांना प्रसंगी प्राण्यांना खाण्यासाठी हे आंबे असेच ठेवायची पध्दत पुर्वापार असेल खेड्यापाड्यात. यात संस्कृती पाहायला मिळते. सर्वच्या सर्व आंबे काढणे व ते खाणे किंवा विकणे ही विकृती आहे. व जेवढी भुक आहे तेवढेच आंबे काढुन खाणे ही प्रकृती आहे. पण या एका प्रसंगात संस्कृतीची खुण दिसते. ही संस्कृती देखील सह्याद्रीचे अंगभुत वैशिष्ट्य आहे. एखादा समाज किती सुसंस्स्कृत आहे हे पाहण्यासाठी त्या समाजात कोणत्या चालीरीती आहेत, कोणत्या कला कौशल्यांना त्या समाजात स्थान आहे , समाजात  कोणते छंद जोपासले जातात , त्या त्या समाजात संगीत, लेखण वाचन आदी विषयी कितपत ज्ञान आहे , या सर्वांवर त्या त्या समाजाचा सुसंस्कृतपणा किती उच्च दर्जाचा आहे हे समजते. भुमीस माता म्हणणारा आपला हा मावळातला समाज सांस्कृतिक दृष्ट्या अभ्यासाचा एक स्वतंत्र विषय आहे. आपल्या विविध चालीरीतींच्या मागे एक विज्ञान आहे. मी दहावी मध्ये असताना माझे इंग्रजीचे शिक्षक श्री गुलाबराव सपकाळ सरांनी मला एक अप्रतिम पुस्तक वाचण्यासाठी दिले. प्रा. सौ कांचनगंगा गंधे यांनी लिहिलेल्या या पुस्तकाचे नाव ही भारी्च आहे. “आपले वृक्ष आपली संस्कृती”. यात आपल्या विविध सणवारांमध्ये चालीरीती प्रथांमध्ये वापरल्या जाणा-या विविध वृक्ष वेलींचे सांस्कृतिक तसेच वैज्ञानिक महत्व त्यांनी सण व वृक्ष वार सविस्तर लिहिले आहे. म्हणजे आपल्या संस्कृतीला वैज्ञानिक आधार आहे व तो अगदी दुरदुर्गम अशा डोंगरद-यात राहणा-या आमच्या सह्याद्रीवासीयांना माहीत देखील होता. कोणत्याही संस्कृतीचे आणखी एक महत्वाचे अंग असते. ते म्हणजे सहजीवन. आधुनिक पाश्चात्य लेखक स्टीफन कॉव्हे याने त्याच्या एका सुपसिध्द पुस्तकात Interdependence is higher value than Independence असे तत्व मांडुन त्या तत्वास कॉर्पोरेट जीवनात यशाची गुरुकिल्ली असे म्हंटले. जाती पाती आणि उच्चनीच असा ओंगळवाणा वाटणारा प्रकार म्हणजे दुसरे तिसरे काही नसुन वर म्हंटलेल्या परस्परालंबित्वाचे एक विकृत रुप आहे. जात हा शब्दास कारकुनी महत्व येण्याआधी आपल्याकडे बलुतेदार नावाची व्यवस्था कित्येक हजारोवर्षे वृध्दींगत होत गेली. त्याचे एक उदाहरण मला अगदी दोन तीन वर्षापुर्वी मोसे मावळ खो-यात फिरताना दिसले. बलुतेदारी संपली. पण काही ठिकाणी ती अजुन आहे. मी एकदा, पानशेत वरसगाव हुन मोटारीतुन मुठा खो-याकडे येत होतो. तसा हा भाग ही दुर्गमच. अजुन ही तासनतास ह्या रस्त्यावर एखाददुस-या वाहनापेक्षा जास्त काही दिसत नाही. तर या प्रवासात, कोंढुर गावाजवळ, एक व्यक्तिने माझ्या गाडीला हात केला व लिफ्ट मागीतली. उंचीने साडेचार ते पाच फुट उंच थोडासा जाड, गव्हाळ, पांढरा पायजमा, सदरा आणि टोपी घातलेला हा माणुस या गावातीलच असणार असे मला वाटले व माझा तर्क बरोबर निघाला. गाडीत बसल्यावर त्यांच्याशी गप्पा झाल्या. त्यात त्यांच्या मुलांचे इंजिनियरींग वगेरे शिक्षणाविषयी समजले. ते कुटुंब सध्या पुणे शहरात