आम्ही अगदी निशब्द बसुन राहिलो. कुणाचा ही कसलाही आवाज येईनासा झाला होता. अगदीच कुणी थोड उशिरा आल असेल तर त्यांच्या पायाखाली येणा-या, वाळलेल्या पानांचा तेवढा कर-कर असा आवाज येत होता. बसलेल्या लोकांना न बोलण्याच्या आणि टॉर्च न लावण्याच्या सुचना जरी दिल्या होत्या तरी त्या सुचनांपेक्षा समोरचे अलौकिक असे दृश्य पाहुनच सगळेच निशब्द झाले होते. अगदी कुणी बोलले तरी आजुबाजुचे त्यांना शांत करीत होते. कुणी टॉर्च लावलाच तर लागलीच बाकीचे लोक “लाईट बंद करा, टॉर्च बंद करा” अशा सुचना, कुजबुज आवाजात देत होते. मी जरी या सहलीचा आयोजक असलो तरी, सहभागी झालेले सर्वच जण, प्रत्येक जणच निसर्गमित्र होऊन समोरील दॄश्यास व निसर्गास कसलीच बाधा होणार नाही याची काळजी घेत समोर सुरु असलेल्या अलौकिक अशा प्रकाशपर्वाचा, लख लख चंदेरी सोहळ्याचा आनंद घेत शांत झाला होता. माझ्यासाठी हे दृश्य काही नवीन नाही, तरी मी देखील नुसताच बाह्य शांततेचा अनुभव घेत नव्हतो तर आंतरिक शांततेचा, परिपक्वतेचा व सामंजस्याचा अनुभव घेत होतो. जीवनरस त्या झाडाच्या प्रत्येक फांदी, प्रत्येक पानांतुन ओसंडुन वाहुन प्रकाशाच्या रुपाने बाहेर येतोय असे हे दृश्य एखाद्या आस्तिकास दैवी वाटावे इतके नाट्यमय होते. आणि निव्वळ तर्कबुध्दीला प्रमाण मानणा-यांसाठी हा सोहळा म्हणजे निसर्गा अदभुत अशी अभिव्यक्तिच आहे. कधी कधी मी आमच्याकडे येणा-या पाहुण्यांसाठी, (वेळ उपलब्ध असेल तर) एक कार्यक्रम घेतो. यामध्ये प्रत्येक जण स्वतः एक वृक्ष आहे असा आविर्भाव आणुन, वृक्षासम भुगर्भातुन जीवनरस घेऊन, झाडाची मुळे, खोड, शाखा-उपशाखा आणि प्रत्येक पानामध्ये तो जीवनरस उर्ध्व दिशेने प्रवाहीत करीत आहोत असा अनुभव घेतो. सोबतच सुर्याकडुन मिळणारी प्रकाश किरणे शोषुन घेऊण, ती अधः दिशेने प्रवाहीत करण्याचा अनुभव देखील घ्यायचा असतो. वा-याच्या झोक्यांसोबत झाडाचे डुलणे, पानांचे हलणे या सगळ्या गोष्टींचा अनुभव प्रत्येक जण स्वःत घेतो. मी खुप वेळा असे केले आहे. आणि असे केल्याने आपण क्षणभर हा होईना, एखाद्या योग्यासारख्या वर्षानुवर्षे उभे असणा-या त्या झाडाचे जीवन जगुन घेतो. पण आता आम्ही समोर जे काही पाहत होतो त्यामुळे मला आमच्या त्या “चला वृक्ष होऊया” या ॲक्टीव्हिटीची आठवण झाली. नव्हे नव्हे निसर्गातील चैतन्याचा उगम, प्रवाह, त्याची उर्ध्वगामी, अधोगामी दिशा, असे सर्वकाही आम्ही पाहत होतो. अवतार सिनेमामध्ये ज्याप्रमाणे ते एकच झाड सर्व चराचराशी जोडले गेल्याचे व जीवनरस सर्वच दिशांनी प्रवाहीत होताना दाखवला आहे अगदी तसेच हे झाड आम्ही पाहत होतो. याच झाडावर, अवती भोवती असंख्य, कदाचित लाखोंच्या संख्येने काजवे घिरट्या घालत होते. तितक्याच मोठ्या संख्येने काजवे झाडाच्या मिळेल खोड, शाखा-उपशाखा, फांद्या, पाने व फुलो-यावर बसुन, त्य झाडास लख्ख प्रकाशित करीत होते. काजव्यांविषयी बरीच तांत्रिक, जैव शास्त्रीय माहिती मी वाचली, लिहिली आहे या पुर्वी. सोहळा पाहत असताना मनामध्ये उठणा-या भावनिक लहरींचा आनंद, नित्य नुतन असा आहे. आंनदाचे भरते येणे म्हणजे काय तर हे हा निसर्गसोहळा पाहताना समजते. आणि हा एकदम निर्भेळ असा आनंद आहे. यात कसलाही स्वार्थ नाही. यात कुणाकडुन ही कसलीही अपेक्षा नाही. यात कसलीही चिंता नाही. यात आप-पर भाव नाही. यात आहे निव्वळ, केवळ आनंदानुभव. आणि या अनुभवातील एक गम्मत अशी देखील आहे की असा अनुभव जर तुम्ही घेतला तर तुम्ही निसर्गाच्या सामंजस्यातील एक घटक होऊन जाता. मग निसर्ग आपोआपच तुमच्या कडुन निसर्गाची आणि तुमची स्वःतची काळजी करवुन घेतो. इवल्याशा, नाजुक त्या काजव्यांचे आयुष्य ते असे किती? एखाद दोन आठवडे किंवा जास्तीत जास्त तीन आठवडे. पण याच तीन आठवड्यात हे काजवे काळोखाला देखील विलोभनीय करतात. हो काजवे काळोखास आणखी जास्त प्रेक्षणीय करतात. काजवे अगदी निर्बंध पणे संचार करीत होते. काजव्यांचे ते झेप घेणे, प्रकाशित होणे निर्बंध जरी असले तरी ते निसर्गातील एकुणच सामंजस्याला आणखी जास्त सुशोभित करीत होते. इथे कसलेही नियम नव्हते. उन्मुक्तपणे यथाशक्ति निसर्गाच्या त्या चैतन्याला अभिव्यक्त करीत हे काजवे, आमच्या समोरच्या त्या झाडावर प्रियराधन तर करीत नसावे ना? मधमाशीच्या पोळ्यावर ज्या प्रमाणे मधमाश्या गच्च गर्दी करतात अगदी त्याचप्रमाणे समप्रमाणात संपुर्ण झाडावर काजव्यांचा हा मनमोहक सोहळा सुरु होता. त्या निर्बंधात देखील एक लय होती. एकतानता होती. आम्ही ज्या ठिकाणी बसलो होतो त्याच्या मागेच एक खोर आहे. या या खो-यामध्ये अनेक उंचच उंच झाडांवर अशाच प्रकारे काजव्यांचे चमचम करणे सुरु होते. आमच्या समोरील झाडावरील हा प्रियराधन सोहळा आम्ही खुप जवळुन पाहत होतो. एकेक काजवा आम्हाला दिसत होता (म्हणजे त्याचे चमकणे दिसत होते). पण दुरवर असणा-या या गर्द झाडी मध्ये सुरु असलेले काजव्यांचे चमकणे एक आणखीच जास्त भन्नाट देखावा तयार करीत होते. काजव्यांचे चमकणे एका झाडापासुन सुरु होऊन, लयबध्द पध्दतीने, दुस-या, तिस-या, चौथ्या असे करीत संपुर्ण जंगलभर पसरत जायचे. पुढचे झाड चमकले की मागचे चमकणे कमी व्हायचे. या चमकण्याला एक रिदम, एक लय होती.या लयीतुन देखील काजव्यासारख्या इवल्याशा किटकांमध्ये संदेशवहन, संवाद किती सुगम व परिणामकारक असेल याचा अंदाज येत होता. आमच्या या सहलीची आणखी एक गम्मत होती बर का! आम्ही जमिनीवर झाडावर लक्ष लक्ष चंदेरी, चम चम, लुक लुक करणारे काजवे पहात होतोच आणि आमच्या वर, त्या अंतहिन आकाशामध्ये देखील अब्जावधी तार-तारकापुंज चमकत होते, प्रकाशित होत होते. आग्नेयेला वृश्चिकाने अर्धे आकाश व्यापले होते आणि वायव्येला सप्तर्षी अस्ता कडे जात होते. या दोहोंच्या मध्ये असंख्य तारे, छोटे-मोठे चमचम करीत होते. वृश्चिकाच्या थोडेसे डावीकडे गुरु ग्रह देखील दिमाखात चमकत होता. त्याच्याही आणखी डावीकडे, क्षितिजाजवळ शनि उगवला होता. रात्रीचे १ वाजुन गेले होते तेव्हा आणि त्यातच ही अमावस्येच्या जवळचे रात्र. आणि आम्ही शनि व गुरु यांच्या मध्ये, धनु तारकापुंजाच्या पल्याड, खुप खोल अंतरिक्षामध्ये आपल्या आकाशगंगेला देखील पहात होतो. कधी जमिनीवर, झाडावर चमचम करणारे काजवे तर कधी आकाशामध्ये चम चम करणारे तारे पहात होतो. एखाद्या कविमनाच्या, संवेदनशील माणसाला आकाशातील तारे जमिनीवर उतरलेले दिसतील व जमिनीवरील काजवे आकाशात जाऊन रोहीत झाल्यासारखे वाटले तर त्यात नवल ते कसले. खाली तारे, वर तारे आणि आमच्या अंतर्मनात देखील तारे. लख लख चंदेरी तारे! भानावर यावे लागते व इतरांनी देखील आणावे लागते. आमच्या बसेस आमच्या प्रतिक्षेत होत्या. मध्यरात्री कॅंपसाईटपर्यंत प्रवास देखील करायचा होता. त्यामुळे मला संर्वांना या तंद्रीतुन बाहेर काढावे लागले. सर्वांना गाडीमध्ये बसवुन आम्ही मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचलो. जाणीवपुर्वक या लेखामध्ये एक ही फोटो टाकलेला नाही. हेतु असा आहे, शब्दांतुन केलेले काजव्यांचे वर्णन वाचुन तुम्ही काजवे प्रत्यक्ष पाहत आहात असेच तुम्हाला वाटावे, हा यामागचा हेतु आहे. तुम्हाला या वृक्षाचे व त्यावरील काजव्यांचे फोटो पहायचे असतील फेसबुक वरील माझ्या अकाउंटला तुम्हाला अवश्य पाहता येईल. https://www.facebook.com/hemant.vavale https://www.instagram.com/hemant_vavale/ हेमंत सिताराम ववले निसर्गशाळा, पुणे
यावेळी वाटीमध्ये रस्सा नव्हता. घेवड्याच्या आकाराचे काहीतरी, वाटीभरुन, सुके, मसाल्यामध्ये मस्त वाफलुन घेतलेले. मी आधी चमच्याने दाबुन पाहिले तर तो जिन्नस अगदी व्यवस्थित शिजलेला आहे की नाही हे तपासुन पाहिले.
जाणीवपुर्वक , मी खाणार असलेला पदार्थ काय आहे हे न विचारताच मी एक चमचा भरुन घेतला, व अलगद घास घेतला
मागच्या काही दिवसात मी सलग १५ दिवस कॅम्पसाईट व वेल्ह्याच्या मावळ पट्ट्यात कामानिमित्त मुक्कामी होतो. कॅम्पसाईटवर नवीन शौचालये, एक बहुउद्देशीय हॉल, व स्वयंपाक खोली बांधण्याचे काम युध्द पातळीवर सुरु होते. इतके दिवस मोबाईल फोन, टिव्ही, लॅपटॉप शिवाय घालवणे म्हणजे निसर्गशाळी एकरुप होण्याची एक संधीच होती. गवंडी बिगारी यांच्या सोबतीने पडेल काम करीत मुक्कामीच होतो तिकडे. दरवर्षी पावसाळ्यात मला पावसाळी रानभाज्या खाण्याची संधी मिळते. या १०-१२ वेगवेगळ्या भाज्या अतिशय लज्जतदार व उच्च पोषणमुल्य असलेल्या असतात. सगळ्याच्या सगळ्या रानभाजांची नावे मला आता नीटशी आठवत नाही. पण मला सर्वात जास्त आवडलेल्या दोन रानभाज्या मला या वर्षी मात्र खाण्यास मिळाल्या नाहीत. पण या वर्षी मला दोन पुर्ण प्रथिने असलेल्या अस्सल मांसाहारी पदार्थ खाण्यास मिळाले. कुमकर दाजींनी (आमच्या साठी जेवणाची व्यवस्था पाहणारे स्थानिक, आम्ही त्यांना दाजी म्हणुन हाक मारतो इतर गाववाल्यांप्रमाणे) जरा अवघडतच मला विचारले की तुम्ही रानातले वशाट खाता का? तुमच्या साठी खास राखुन ठेवलय आम्ही एक वाटी. रानातले वशाट म्हंटल्यावर मला आधी काही सलजले नाही पण मग वशाट मग कसलेही असु देत मला चालतेच अशी आठवण झाल्यावर व रानातले वशाट म्हणजे नक्की काय हे कुतुहल शमवण्यासाठी हो म्हणालो. एका वाटीमध्ये विमलबाईने (दाजींची पत्नी) ते वशाट आणले. चमचा सुध्दा होता. वाटी माझ्या समोर टेबलावर होती, चमचा वाटीत व रस्सा आणि त्यात काहीतरी दिसत होते. काय होते ते पाहुन समजेना. रस्सा चांगलाच गरम होता. वाफा निघत होत्या त्यातुन. श्रीगणेशा करण्यासाठी कसल्याही मुहुर्ताची वाट थोडीच बघायची होती इथे! चमच्याने थोडी ढवळाढवळ करुन एक चमचा रस्सा व त्यात ते वशाटाचा एक तुकडा घेतला. आणि तोंडात टाकला. पहिल्यांदा चटका बसला कारण रस्सा अजुन ही चांगलाच गरम होता. चटका विरतो न विरतो तोच मी त्या वशाटाची चव ओळखली. माझ्या लहानपणी बाबुजी (माझे वडील) आवर्जुन डोंगरावरुन, शेतातुन आमच्या आणायचे तेच हे वशाट. अळंबी अर्थात मशरुम. अ हा हा काय ती भन्नाट चव! ते वशाट काय आहे ते समजल्यावर मग वाटी पुर्ण रीती झाल्याशिवाय थांबतो तो खवय्या कसला ? या रानमेव्याला वशाट म्हणजे मांसाहारी समजतात मावळातले लोक. यास भुछत्र असे ही म्हणतात. विमल बाई कडुन (आणि पुर्वी बाबुजींकडुन देखील ऐकले होते) समजले की भुछत्र म्हणजे अळंबी जंगलात अनेक प्रकारच्या येत असतात. व त्या सगळ्याच खाद्य म्हणजे खाण्यास योग्य आहेत असे नाही. यात काही मनुष्यास अपायकारक सुध्दा असतात. जंगलातील कोणत्या प्रजातीची अळंबी खाण्यास योग्य आहे हे माहिती असल्याशिवाय अळंबी खाण्याचा पराक्रम करु नये. अळंबी मध्ये भरपुर प्रोटीन्स असतात. शहरात जी शेती करुन पिकवलेली अळंबी मिळते तिस मात्र शाकाहारी समजले जाते. मावळपट्ट्यात जुलैचा मुसळधार पाऊस थोडा ओसरु लागला व उन पावसाचा लपंडाव सुरु झाला की पडणा-या पावसाला अळंब्याचा पाऊस असे म्हटले जाते. अळंब्याचा पाऊस म्हणण्यामागचे कारण असे की या दिवसात अळंबी भरपुर वाढते व मुबलक प्रथिने मिळवण्याचा मावळी लोकांचा हा अळंबीचा हंगाम सुरु होतो. ग्रामीण भागात मोठय़ा प्रमाणात नैसर्गिक अळंबीचा खाण्यात वापर केला जातो. ग्रामीण भागात काबुलभिंगरी-धिंगरी, सात्या, डुंबर सात्या, केकोळय़ा या नावांनी अळंबी प्रसिद्ध आहे. आयुर्वेदात अळंबीला मोठे महत्त्व आहे. औषधी असणा-या अळंबीत कॅलरीज तसेच प्रथिनेही मोठय़ा प्रमाणात आढळतात. तसेच अळंबी अॅलर्जी प्रतिबंधक, कोलेस्ट्रॉल प्रतिबंधक व कॅन्सर प्रतिबंधकही असल्यामुळे रुग्णांना तसेच मधुमेहाच्या रुग्णांनाही अळंबीचे सेवन आरोग्यदायी ठरते. अळंबीत व्हिटॅमिन्स, फॅट्स आणि कॅलरीजही आढळतात. व्हिटॅमिन डीचे प्रमाण अळंबीत मोठय़ा प्रमाणात असते. दुसरा वशाट रानमेवा कोणता ते पुढच्या भागात… कळावे
Nature shows us it’s beauty and glory in countless shapes, forms, and colors. What is the most beautiful about it? That is impossible to say with all her surprises and secrets, magical sceneries? Still, one of the most dramatic and breathtaking creations of nature is certainly the waterfall. Watch a gushing waterfall we tried to embrace on our recent nature excursion.